Thursday, January 15, 2015

ऐका कहाणी गीतेची - अध्‍याय पंधरावा – पुरुषोत्‍तम योग


अध्‍याय पंधरावा – पुरुषोत्‍तम योग

ऐकव गीते तुझी कहाणी, निर्मळ निर्मळ तुझी वाणी
जे सांगते ते ऐकत जा, ज्ञान कृतीतून दाखवत जा
सुखदु:खी सम रहावयाचे, आसक्‍तीला जिंकायाचे
रजस्‍तमांना टाकायाचे, सात्विक वर्तन तर सवयीचे
त्रिगुणांनी जे असे पोसले बघता बघता झाड वाढले
खाली फांद्या वरी मुळे ज्‍या, झाड आजवर कुणा न दिसले 
अश्‍वत्‍थाने नभ झाकळले, तिमिराने मन फार डहुळले
असंगशस्‍त्राने तू छेदी, आसक्‍तीला पार पिटाळी
यत्‍न करावा भक्‍तीसह रे ज्ञान येत मग शोधत शोधत
शांतिसुखाची जन्‍मभरी मग लाभे तुजला अखंड सोबत
चिखलातुन जे वरती आले कमळ सुगंधी स्‍वच्‍छ सोवळे
पवित्रता घे, अलिप्‍तता घे यत्‍ने मानव देव जाहले
जुने जातसे, नवे येतसे, नश्‍वरताही आहे सुंदर
जमीन निघते आधी तापून म्‍हणून जलधारा त्‍या सुखकर
सृष्‍टी देते शिक्षण सगळे, प्रेमपूर्ण करवूनि घे सेवा
शेती, उद्यम, व्‍यापारातही आनंदच देवांच्‍या देवा
कर्मातुनि श्रीहरिचे पूजन सर्वच कर्मे अतिशय मंगल
अवघे जीवन व्‍हावे हरिमय उदात्‍त, उन्‍नत, अतीव सोज्‍वळ
नाही चिंता, नाही भीती, परिग्रहांचे नावच पुसले
आता चलावे त्‍याच पथावर ज्‍याच्‍यावरुनी संत चालले
टिळक-आगरकर, बापू तात्‍या, द्वैत न कोठे नावाला
मार्ग वेगळे तरी पो‍चवित निश्चित एका गावाला
श्रवणाने चिंतना चालना कास धरा जिज्ञासेची
निमित्‍त केवळ लेखक समजा, ऐका कहाणी गीतेची ऐका कहाणी गीतेची



No comments:

Post a Comment