Sunday, January 11, 2015

ऐका कहाणी गीतेची - अध्‍याय बारावा – भक्तियोग


अध्‍याय बारावा – भक्तियोग

ऐकव गीते तुझी कहाणी, निर्मळ निर्मळ तुझी वाणी
भक्तिरसाचा महिमा येथे स्‍वयेच गातो भगवंत
भक्‍ती मुरता अंतरात मग काय नि कसलीशी खंत
अंतरात भरला ओलावा अध्‍यायच अमृतधार
आतुन स्‍फुरते नाम अनावर मनोमलिनता जाणार
उंबरठ्याचा अवघड घाटहि तुकया वाणी ओलांडी
हरिपाठाची ऐसी महती वानू जाता हो कोंडी
देह भले हा राहो जावो कोण तयाची तमा करी
भाविकतेने गाता गाथा जो तो होतो वारकरी
अवघे वीसच श्‍लोक यातले अभ्‍यासक पावे विश्राम
सुजाण श्रोता जो तो अर्जुन श्रवणामध्‍ये भेटे श्‍याम
जे करतो देवाचे कार्यच असा बाळगा मनि विश्‍वास
नामांकित मग करून सोडा सगळे अपुले श्‍वासोच्‍छवास
सगुण नि निर्गुण उभय विलक्षण समजुन घ्‍या ते उमजेल
भक्तिपथाने चलाच पुढती वाट बघे तो गवसेल
कृष्‍ण कृष्‍ण जय लय सांभाळा मधेच गर्जा हरी हरी
पार्थसारथी तोच आपली नाव लावितो पैलतिरी
फुले मोगरा ज्ञानोबाचा, वांगी कवळी सावत्‍याची
रसाळ वाणी तुकयाची, घ्‍या संगत आता नाम्‍याची
गद्य असे का पद्य न ठावे तो सांगे ते लिहित बसे
भक्‍तीमध्‍ये भिजला कवि मग गात सुटे जमतसे तसे
सारी चिंता भगवंताला, नको मनामधि संसार
सोहं  मार्जन सडा गायने, आपण स्‍वागत करणार
मेंदीसम आली रंगाला आता महती भक्‍तीची
घराघरातुन, वाचा ऐका वाटा कहाणी गीतेची
ऐका कहाणी गीतेची ऐका कहाणी गीतेची


No comments:

Post a Comment