अध्याय सतरावा – श्रद्धात्रयविभागयोग
ऐकव गीते तुझी कहाणी, निर्मळ निर्मळ तुझी वाणी
वर्तन घेरे बाळा बांधून, आनंदच वाटेल जीवनी
कणकणाने, क्षणक्षणाने साधकांत होशील अग्रणी
देहाचे आरोग्य राख तू, सृष्टीचे तू करी निरीक्षण
जगावयाला लाग बालका समुदायासह अपुले जीवन
ओघे आले काम यज्ञ ते, दान सवयीचे होवो तुजला
सहकाराविण प्रगती नसते, पुरवावे बल संघटनेला
आहाराविण शक्ती कुठली भोजन सात्त्विक तुझे असूदे
सामाजिक सेवा घेण्यास्तव कणाकणाने काया झिजु दे
मिताहार, मितनिद्रा आणिक रंजन सात्विक मनामनांचे
सुखदु:खांची देवघेव नित बंधारे ना अहंपणाचे
कर्म करांनी, नाम मुखाने राम जीवनी भरला अनुभव
जे माझे ते सर्व जनांचे प्रांजळपण हे अमोल वैभव
आचाराची जोड विचारा नित्य नवनवे प्रयोग करणे
चूक आपली ध्यानी येता सुधारून ती स्वयेच घेणे
समाजात संतोष नांदता एकरूप होऊया सगळे
रामराज्य का श्रीरामाचे याहून काही असे वेगळे?
दुर्योधन जर ठरे अडथळा कठोरतेने दूर करावा
बलशाली बलहीन यामधे नकोच संशय नको दुरावा
समाज व्यक्ती विरोध नाही नेता सोयीसाठी असतो
आज्ञांकितता, प्रेमळ श्रद्धा अनुयायांचा खाक्या बनतो
सूत्रमय उपदेश विखरला पानोपानी श्रोते व्हावे सावधान
ऐका कहाणी गीतेची ऐका कहाणी गीतेची
No comments:
Post a Comment