अध्याय सातवा - ज्ञानविज्ञान योग
ऐकव गीते तुझी कहाणी, निर्मळ निर्मळ तुझी वाणी
माया तरावी वाटते, बाळा धर वासुदेव
मोह सरे आपोआप, नासे आपोआप द्वंद्व
त्याला ओळखावे बाळा, येथे तेथे भरलेला
आता कुठली आसक्ती, जेथे भक्ती ती अमला
भक्ती थोरला उपाय, जाण्या सगळे अपाय
येता जाता हरि ध्याय, हा तो न्यायाचा ही न्याय
तूच स्वरूप आनंद, याचा कैसा पत्ता नाही
तुझे आहे तुजपाशी, तुका सांगतच राही
भक्ती साध्य नि साधन नाम गेय नि गायन
वीणा नारदीय गाई नारायण, नारायण
वाटे हवे, मागा देवा आहे बाळांनो ती भक्ती
परि भक्तीसाठी भक्ती तीच लाभाविण प्रीती
फिरे पाठीवर हात, माय कवच घालते
सारे आघात सोसाया, बळ आगळे लाभते
हरिनाम घेता घेता बाळा तूच होई हरी
नामदेव ज्ञानदेव दोघे बाळा तुझ्या देही
अरे जिज्ञासेच्या पोटी लागतात मोठे शोध
होवो कल्याण, मंगल सारे हरी हाच बोध
पूर्ण भक्त तोच ज्ञानी सर्वांगांनी वाढ झाली
त्याच्या ध्यानी कानी आली सो हं हरीची
मुरली
एक नटे परमात्मा तोच ठेवा आनंदाचा
नये विसरु कधीच हरि भुकेला भावाचा
घेत संवादाची रुची काळ सार्थकी लावावा
सांगा कहाणी गीतेची चला हरिचिया गावा
अशा आगळ्या गोडीची ऐका कहाणी गीतेची ऐका
कहाणी गीतेची
No comments:
Post a Comment