गीतादर्शन मध्ये जुलै १९७० च्या अंकात प्रसिद्ध झालेली ही कविता
पुनरपि सांगा गीता
कुंजविहारी गिरिधारी हो
पुनरपि सांगा गीता ।।धृ ॥
प्रसन्न होउन धनंजयावर
सुधा वर्षली तुम्ही सुधाकर
अम्हा चकोरा किरण कोवळे वितरा भगवंता ।।१।।
अकर्मण्यता अम्हा ग्रासते
माया ममता अम्हा भुलविते
सुदर्शनाते फेकुनि तोडा अज्ञानज बंधा ।।२।।
स्वधर्म अमुचा अम्हा कळावा
अभिलाषांचा निरास व्हावा
कर्मदीप हे कराकरांतिल उजळू द्या पंथा।।३।।
'मी कर्ता' हा गर्व फुकाचा
वृथाच आम्ही वहावयाचा
पद्मपत्रसम अलिप्तता ती शिकवा धीमंता ।।४।।
वस्तुवस्तुगत तुम्ही दिसावे
अंतर्यामी पूर्ण भरावे
चराचरावर अम्हा जाणवो तुमची अधिसत्ता ।।५।।
मोह निरसता धनंजयाचा
ध्वज उंचावे पुरुषार्थाचा
योगेश्वर गुरु, शिष्य नरोत्तम भूषवितो भारता ।।६।।
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
No comments:
Post a Comment