Thursday, September 17, 2015

सिद्धिविनायक चला वंदु हो सारसबागेतला...

सिद्धिविनायक चला पाहु हो सारसबागेतला 
सिद्धिविनायक चला वंदु हो सारसबागेतला ।।धृ।।

देहामध्ये हृदय तसे ही मंदिरात मूर्ती 
गौरवर्ण तो घे आकर्षून सूक्ष्म दिव्यदृष्टी 
       प्रभातसमयी गा भूपाळी साधा ती वेळा ।।१।।

अथर्वशीर्षाचे आवर्तन मनोमनी करु या 
संघरुप तो सिद्धिविनायक आत जागवू या 
       भाविकजन हो जनकल्याणा चला दर्शनाला ।।२।।

प्रदक्षिणा घालता होतसे चिंतन सुरु आत 
सुगंध दुर्वांचा तो ओला श्रद्धेने घेत 
       तीर्थ प्राशुनी प्रसाद थोडा सुखवो चित्ताला ।।३।।

इथे बसावे नयन आपुले झाकुनिया घ्यावे 
जनी असूनी मनानेच परि एकांती जावे 
        सोहं, तो मी अद्वयानुभव येवो या काळा ।।४।।

मागणेच जे मागायचे विसरुन  ते जावे 
सिद्धिविनायक दर्शन ऐसे तनिमनि झिरपावे 
        श्रीरामाला सिद्धिविनायक सौभाग्ये पावला ।।५।।

- श्रीराम बाळकृष्ण आठवले 
  ३ जानेवारी १९९५ 

No comments:

Post a Comment