Friday, July 7, 2017

श्रीरामायणरहस्यचिंतन

श्रीरामायणरहस्यचिंतन

राजा दशरथ नीतिमंत तो बलशाली होता
कौसल्या शालिनी सुशीला त्याची पतिव्रता ! १
त्यांच्या उदरी यत्नरूप अवतरे प्रभू राम
लक्ष्मण आला शक्ति घेउनी बंधू गुणधाम ! २
भरताच्या मनि बंधुप्रीती सरलहृदयता ती
अनुकरणे शत्रुघ्न धन्य हो बालक शुद्धमती ! ३
सत्यरूप सीतेने वरिले श्रीरघुनाथाला
धरती उल्हासाने भेटे जैसी गगनाला ! ४
कांचनमृगमोहाने फसली व्याकुळली सीता
अहंकाररावणे झडपली संधी सापडता ! ५
श्रीरामाच्या नामस्मरणे कल्याणच झाले
भक्तिरूप हनुमंते पतिचे कुशल सर्व कथिले ! ६
अहंकार दैत्याला वधिता सफल रामकार्य
रामायण सांगते मानवा पणा शौर्य लाव ! ७
यत्ना अंती यश ठरलेले विनम्रता भक्ती
या देहातच मुक्ति लाभण्या सापडते युक्ती ! ८
अशांत लंका शांत अयोध्या पोचावे तेथे
विकारवादळ चित्तामधले नीतीने शमते ! ९
नीती सुटता विटंबना ती पदोपदी होते
सांगे भारत उभ्या जगाला 'सत्यमेव जयते' ! १०
कुटुंबनीती हे रामायण पारायण करणे
सौहार्दाने सामर्थ्याने नारायण बनणे ! ११
सेवाभाव नि टापटीप ती काय कमी येथे
गृहलक्ष्मी ही संस्कारांनी घर मंदिर करते ! १२
श्रीरामाची कथा ऐकता जाणू भावार्थ
शिकता शिकता कथा पसरवू पाची खंडात ! १३

No comments:

Post a Comment