Sunday, July 16, 2017

गीतारहस्य नित्यपाठ




गीतारहस्य नित्यपाठ

कृष्ण कृष्ण म्हणत मला कृष्ण व्हायचे
त्यज विकार कर विचार हे म्हणायचे ! १

कृष्ण जन्म बंदिगृही मुक्त तो सदा
गीता ही कथित सार चिंतका तदा ! २

मन अपुले अलग करुनि शांत व्हायचे
नयन मिटुन मार्ग सुचुन मुक्त व्हायचे ! ३

मीच मला सावरता विजय लाभला
मन ओतुनि सजवी कर्म भक्त तो भला ! ४

यश येवो अपयशही फरक कोणता?
आस फली नसत तिथे खेद कोणता? ५

दु:खमूळ वखवख ती फेकता दुरी
संयमात सौख्य सहज समजवी हरी ! ६

कृष्ण कसा जगला गीतेत हे कळे
लोकमान्य चरित गूढ चिंतने कळेे ! ७

समजे जे थोडेही वाचणे पुन्हा
आचरणी आणुनि ते सांगणे जना ! ८

सोसुनि आघात सहज दडव वेदना
सोने निकषा उतरत सरत मीपणा ! ९

यत्ना ना जमत असे या जगी नसे
वैराग्ये मनुजाची कांति खुलतसे ! १०

मन प्रसन्न जग प्रसन्न मर्म जाणणे
हसऱ्याचे वावरणे दिसत देखणे ! ११

दु:खाला विसरताच दु:ख संपते
आठवता भूत बनुनि छळत सतत ते ! १२

जगलो वा मेलो वा सृष्टि चालते
सुजन कधि न मीपणास माथि मिरवते ! १३

सृष्टीशी समरसता सत्व वाढते
रुसता तुज लागे जगण्यास एकटे ! १४

गीतेचे हे रहस्य जाण नाम घे
बदल किती तनि मनि तव तू बघून घे ! १५

आसक्ती दु:खमूळ हट्टही नको
काम नको क्रोध नको द्वेषही नको ! १६

जे लाभे त्यात तोष हाव ना कधी
तो प्रसन्न कार्य करी जग म्हणे सुधी ! १७

कौशल्या लाव पणा कार्य करत जा
हरिपूजा तीच समज दंभ कर वजा ! १८

यश लाभे कधि अपयश हर्ष खेद ना
मन ज्याचे नित्य तृप्त तो रुचे जना ! १९

निर्मल मन, निर्मल तन मतिहि निर्मला
आत्मतृप्त हरिभक्ता जगति ना तुला ! २०

अभय मनी शक्ति तनी देत प्रार्थना
गीतामृत नित सेवी त्यास भ्रांति ना ! २१

आत्म्याचा कर विचार जाण तू स्वत:
तूच कृष्ण कृष्णहि तू उमज तत्वत: ! २२

कर्म करी सर्व हरि फलहि हरीला
हे कळले तोच जगी पूर्ण मोकळा ! २३

आत्मा हा जीव प्राण त्या विना कुडी
कोसळते भूमीवर दीन बापडी ! २४

जोवरती जीव आत शर्थ तू करी
तोवरती कार्य करुन म्हण हरी हरी ! २५

देव असे जरि न दिसे सुज्ञ जाणतो
नीति जगे त्या श्रीहरि ध्यानि भेटतो ! २६

जैसा मी तैसे जन जाणता खुला
प्रगतीचा मार्ग असा चालणे तुला ! २७

तूच राम तूच कृष्ण स्वस्वरूप ते
ओळख ही पटली तुज भाग्य समज ते ! २८

संतोषा नाव मोक्ष खूण स्वस्थता
बुद्धि शुद्ध तन हि स्वच्छ सहज अवस्था ! २९

मजवरती तेच प्रेम हरिवर जडता
व्यक्ति होय हरिमय ती हीच धन्यता ! ३०

हृदयी वसत घडवि कार्य सद्गुरु म्हणा
कर्म सुबक सुखद शुभद हटवि मीपणा ! ३१

बुद्धि शांत सम ठेवू घेऊ दक्षता
आत्मरूप देव बघत भाव तो स्वत: ! ३२

गीतेचे हे रहस्य टिळक सांगती
श्रीरामा कळत तसे शब्द बोलती ! ३३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment