Friday, July 28, 2017

प्रसाद पुष्पे - दृष्टी बदला, सृष्टी बदलेल!

प्रसाद पुष्पे - दृष्टी बदला, सृष्टी बदलेल!

आपण जे काम करतो ते कोणत्या दृष्टीकोनातून? ते करत असताना आपण जळफळतो का? कसेबसे उरकून टाकतो का? तसे असेल तर त्यापासून आपल्यालाही सुख नाही, दुसऱ्यालाही समाधान नाही.

"मी हे कर्म करतो" हा कर्तेपणा उपद्रवकारक आहे.  नदी वाहत असते पण वाहण्याचे तिला भान नाही. सूर्य उगवतो प्रकाश देतो पण त्याला त्याची जाणीव नाही. हातून घडत असलेल्या कर्माकडे बघण्याची दृष्टी बदलली की ते कर्म अधिक चांगले करण्याचा हुरूप वाढेल.  हात काम करीत असावेत, मुख नाम उच्चारीत असावे. नकळत मन रामरंगी रंगेल, शांत होईल.

जे आवडत नाही - अवघड वाटते तेही काम भगवंताचेच असे समजावे, शिकून घ्यावे.

तो क्षणोक्षणी शिकवत असतो आपण शिकत नाही.  तो भरभरून आनंद देत असतो, आपण आनंद घेत नाही. "नारायण" हा मुक्तीचा मंत्र आहे तो जपत राहावा.

कर्मे कोरडी, भावशून्य न व्हावीत.     त्यात ओलावा असावा. तो नामस्मरणाने निर्माण होतो.

तक्रार करत राहणारा कोणालाच आवडत नाही. आपण ज्या परिस्थितीत असू ती नीट समजून घ्यावी, आपल्या सोयीची भूमिका ठरवून घेऊन तसे वागावे.

संयम, विवेक, सहनशीलता, आत्मीयता,  प्रेमभाव हे गुण ज्याने अंगी बाणवून घेतले त्याला सगळे विश्वच आपले घर वाटते.

तो सगळ्यांचा, सगळेच त्याचे!
पूजा हे कर्म न बनता प्रत्येक कर्म  भगवंताची पूजा म्हणण्याच्या योग्यतेचे व्हावे.

जीवन ही जटिल समस्या आपल्या वागण्याने, वृत्तीने वाटते.  जीवन हा गमतीचा खेळ आपणच बनवू शकतो. होय ना?

लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment