श्रीकृष्णाचे जीवन मजला गीता गाता उलगडते
जीवन आहे एक रणांगण झुंजाया शक्ती मिळते!१
निजकर्तव्या करावयाचे कर्तेपण तू सोडून दे
कृष्णच कर्ता फळही त्याला व्यर्थ काळजी टाकून दे!२
तनु ही येई तैशी जाई शरीर काही नसशी तू
हासत हासत सोस वेदना अविनाशी जो आत्मा तू !३
शांति मनाची का गमावशी? चिंतातुर का होशी तू?
धर्मध्वज तू उंच उभारी विजयासाठी निमित्त तू !४
मोह न कसला श्रीकृष्णाला आकाशाला लेप नसे
हवे नको पण जाता विसरून शांति रहाया येत असे!५
सदासर्वदा जो आनंदी स्थितप्रज्ञ माधव होता
तसे प्रयत्ने होता येते क्रिया विवेके पालटता!६
मना उलटण्या नाम स्मरुनी अभ्यासाला बसायचे
दिवसाकाठी असंख्यदा तू सोsहं ध्यानी रमायचे!७
निवृत्तीचे नाव न येथे रूप बदलते कर्माचे
कर्मच आहे सुंदर साधन स्वानंदाच्या प्राप्तीचे!८
तुरुंगात श्रीकृष्ण जन्मला मुक्त कराया बद्धांना
रणांगणावर कथिली गीता बुद्ध कराया सर्वांना !९
निराश जे मन प्रथमाध्यायी उल्हासाने नृत्य करी
धर्माचरणा भिडते जाउन किमया ऐशी हरी करी!१०
गुणधर्मांना अपुल्या जाणुन कार्य काय ते ठरवावे
कर्मयोगमार्गाने आपण दिव्यपदाला पोचावे!११
कर्तव्यास्तव जीवन अपुले माधव जीवन ते जगला
अनंत रूपे अनंत वेषे समस्त विश्वी वावरला!१२
मी नच कर्ता मी तर साक्षी साक्षित्वाने वागावे
साक्षित्वहि ते अंति संपते निरीक्षणाने उमजावे!१३
राम कृष्ण हरि गाता गाता देहभानही हरपावे
त्रिगुणांनाही सहज लंघुनी जीवन अपुले उजळावे!१४
सदाचार सवयीचा होतो अनुभव ये ज्याला त्याला
अम्हा साधका अंकित करशी कृपा तुझी ही गोपाळा!१५
या गीतेच्या गंगेकाठी सांजसकाळी मी यावे
आचमनांनी तृषा शमावी निर्वासन मानस व्हावे!१६
मंदिरात चल उपासनेला घरही मंदिर बनवावे
तिमिरनाशना गीता गाउन कृष्णचरित अभ्यासावे !१७
अठरा कडवी नित्य म्हणावी प्रसाद मोदे सेवावा
श्रीरामाचा हट्ट एवढा जनार्दनाने पुरवावा!१८
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
No comments:
Post a Comment