Monday, June 4, 2018

अवघाची संसार सुखाचा होण्यास.

अंग मोडूनि काम करावे आळस नाही कामाचा !१
घरदार आपले स्वच्छ ठेवावे, ठाव नसावा केराचा!२
घर हे मंदिर समजावे, प्रत्यय यावा शांतीचा!३
हास्य मुखावर विलसावे, प्रपंच सगळा रामाचा!४
नको अहंता, नको दुरावा आदर्शच सहकार्याचा!५
पति नारायण पत्नी लक्ष्मी भाव असा हा जपायचा!६
तुच्छ न दुसऱ्याला समजावे मान राखणे दुसऱ्याचा!७
मनी मानसी अढी नसावी डाव मोजक्या घटिकांचा!८
झाले गेले ते विसरावे मार्ग चांगला भक्तीचा!९
स्वावलंबने श्रीहरि तोषे यज्ञ खरा सत्कर्माचा!१०
देता घेता वाढतसे सुख हात असावा कर्णाचा!११
समेट करणे पुढती होउन काय भरवसा देहाचा!१२
चैन न वाटो गरज कदापि निर्व्यसनी तो सगळ्यांचा!१३
मुले खेळती ते घर गोकुळ खेळ असे भगवंताचा!१४
मना रोग ना शिवो कधीही छंद जडो हरिनामाचा!१५
सद्गुण रुजती अनुकरणाने जो सावध तो भाग्याचा!१६
तथास्तु वदतो वास्तु पुरुष तो सत्संकल्पच वदायचा!१७
शुभं करोति नित्य म्हणावे सांगावा गृहलक्ष्मीचा!१८

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment