Sunday, June 17, 2018

आशीर्वाद

मुला तुला शाळेत घातले तुझेच तुजला शिकायचे
बलशाली हो, हो उद्योगी विश्वाला सुख द्यायाचे! ध्रु.

अक्षर सुंदर मोत्यावाणी नयनांचा तो आनंद
हिशेब वेळेचा द्रव्याचा, कलागुणांचा घे छंद
एकलव्य तू गुरुनिष्ठेने पुढे पुढे तुज जायाचे!१

इतिहासाने स्फूर्ति लाभते, हस्तकला दे उद्योग
चित्रकला सौन्दर्य दाखवी संस्कारे हरिशी योग
विशाल दृष्टी, विशाल सृष्टी बाल्यी हे जाणायाचे!२

भूगोलाने दिली प्रेरणा सारे जग मी पाहीन
भाषा फुलवी भावभावना दुःख दुज्याचे जाणेन
संगीताने तुला शिकवले समाजजीवन जगण्याचे!३

पाठांतर हे ज्ञान जिभेवर थोरांचा सहवास खरा
स्फूर्तिकेंद्र तू हो सगळ्यांचे असा खळाळो मोदझरा
मेरूसम तू राही निश्चल वज्रासम तुज होण्याचे!४

कृतज्ञता ही सद्गुरु भक्ती विनम्रता ही श्रीमंती
दैवीगुण तू जोडत जाता वश होती ऋद्धी सिद्धी
तुजवर केंद्रित सगळ्या दृष्टी आशीर्वच तुज थोरांचे!५

सहली शिबिरे विरंगुळा हा कंटाळ्याला पिटाळले
प्रयोगशाळा प्रात्यक्षिक ते अचूकपण अंगी आले
अनुभवातुनी ज्ञान लाभते ज्ञान देउनी फुलायचे!६

दूरदर्शना घरी सोड तू खेडोपाडी भटकत जा
कशी मोकळी हवा कसा तो निसर्ग त्याची चाख मजा
काटकपण जर अंगी आले मानच देणे देवाचे!७

अंकुरणारे बीज जसा तू, तूच उद्याचा वटवृक्ष
तूच जिवाचा आश्रयदाता समाज ठेवुन हे लक्ष
वसा घेतला उतू नको तू असे वागणे पथ्याचे!८

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment