Wednesday, June 20, 2018

सखि प्रवास सुखमय उत्तररंगाकडे....

अशि वाट संपता खडतर वळणे-कडे
सखि प्रवास सुखमय उत्तररंगाकडे!ध्रु.

हातात घालुनि हात फिरत असताना
गुंतलो मने कल्पना मुळी नसताना
आकर्षण मधुमय भान हरपवी गडे
सखि प्रवास सुखमय उत्तररंगाकडे!१

कालची संकटे, भीती, कठिण प्रसंग
जे गडद भासले पार निवळले रंग
उतरलो कसोट्या शिकलो अवघड धडे
सखि प्रवास सुखमय उत्तररंगाकडे!२

सुरकुत्या तनावर अंधुक अंधुक दिसे
परि उठले असती चरणांचे पथि ठसे
कधि नव्हते इतके परस्परांविण अडे
सखि प्रवास सुखमय उत्तररंगाकडे!३

देऊन न सरते घेउन उरते सदा
कुणी म्हणोत माया वरदायिनी हिज वदा
जरि थकते पाउल पथावर पडे पुढे
सखि प्रवास सुखमय उत्तररंगाकडे!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment