Sunday, June 24, 2018

श्री साई बावन्नी

शिळेवरी साई बसले मनी रूप हे ठसलेले
फिकीर विश्वाची ज्यांना शिरडी आवडली त्यांना
रोखुनि डोळे ते बघती मनातले झणि ओळखती
साई साई मी म्हणता रसना प्रेमे ओलवता
दोन्ही डोळे हे भरता मनोमलिनता मावळता 
श्रद्धेचा उगवे चंद्र लोप पावते ते तिमिर
सबुरी म्हणजे सोशिकता धैर्याची शोभे माता
उदी ठसवते नश्वरता संजीवक सगळ्या भक्ता
ती लावावी भाळाला का भ्यावे कळीकाळाला
ज्याच्या खांद्यावर झोळी अशुभाची करतो होळी
कांदाभाकर आवडते गाणे देवाचे रुचते
सबका मलिक एकही है उपदेशाचे सूत्रच हे
मानवतेचे बालक हा शांतीचा आश्वासक हा
धर्माचा अभ्यासक हा मांगल्याचा पूजक हा
जरी लेखणी ना धरली उपनिषदे त्या स्फुरलेली
कोणासाठी शंकर हा दत्तगुरु कोणासी हा
आकारी नच मावतसे मनामनातून शिरलासे
ज्ञानेश्वर हा आळंदीचा तुकाराम हा देहूचा
पैठणचा जणु नाथ असे या रूपे सद्भाव वसे
दासगणू नि उपासनी आवडती त्यांना दोन्ही
संतकवी स्त्रीचा त्राता व्यवहारीही नि:स्पृहता
शिरडी तैसी साकोरी तीर्थक्षेत्रे भूमिवरी
देहाची सोडा ममता मी असताना का चिंता
जो कोणी पायरी चढे भाग्य तयाच्या पुढे खडे
चुकले कोठे कळले ना भगवंताला ये करुणा
साई साई असे म्हणा कुणी अधिक ना कुणी उणा
रोग निपजतो देहात उपचारही तो देहात
देव नांदतो भावात धर्म वसे माणुसकीत
समता जगती वर्तावी अहंभावना खंडावी
मोदाची गुढी उभवावी शिरडीची यात्रा व्हावी
स्मराल तेथे मी आहे स्मराल तेव्हा मी आहे
स्मराल तैसा मी आहे कणकण क्षणक्षण मी आहे
पायघोळ कफनीच बरी फडके माथी मुकुट जरी
साई दीनास्तव दीन साई लीनाहुन लीन 
साई वृद्धाचे आसू साई बाळाचे हासू
साई जैसा मशिदीत मंदिरात गुरुद्वारात 
चुकले हळहळ वाटू दे माय आसरा देऊ दे
सुधारणा ती घडवू दे भक्तीपथावर आणू दे
नरनारी सगळेच हरि साईनाथ तू असे करी
उजाड भूमी भिजवावी हिरवा शालू ती ल्यावी
नको रुक्षता वचनात हवी सुजनता वृत्तीत
आवेगे जवळी घ्यावे बालकास या चुंबावे
जातिभेद ते विसरावे साई साई मी गावे
उणे भरूनी काढावे अंतर्मुख बनता यावे
स्थल काला ओलांडावे विश्वात्मक मज बनवावे
गीतेचा जडू दे छंद राम कृष्ण हरि गोविंद
साई सत्चरिता ध्यावे जे न दिसे ते उमजावे
माझा मी घेता शोध  कुठे काम कोठे क्रोध
मशीदीतली दिपवाळी बारा मास घरी व्हावी
माझ्या नकळत हे व्हावे मनमंदिरि साई यावे
उघड दार मन खुले करी साईनाथा त्वरा करी
साई बावन्नी इथे पुरी साईचरणा राम धरी

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment