Tuesday, June 5, 2018

कलियुगात अवतरले रामराज्य भूमीवरी - शिवराज्याभिषेकावर आधारित गाणे



रायगडी शिंग नभी उच्च स्वरे घोष करी
कलियुगांत अवतरले रामराज्य भूमीवरी ! ध्रु.

तीर्थरूप माउलीला
वंदण्यास शिव झुकला
थरथरता कर फिरला
रोमरोम तनी फुलला
हर्षभरे नयनांतुनि ओसंडत अश्रूसरी!१

गंगा-सिंधु-यमुना
गोदा-कृष्णा-पवना
भरभरुनी कलशांना
घालण्यास शुभस्‍नाना
तटिनी भगिनी मिळुनी जमुनी पोचल्यात येथवरी!२

शोभतसे छत्र शीरी
धारदार खड्ग करी
भवति उभे सहकारी
देई सभा ललकारी
विष्णुचा अंश तूच, तू अमुचा कैवारी!३

वेदमूर्ति गात गान
कर्ण नवा देत दान
वडिलांचा होत मान
तृप्‍त सकल थोर-सान
शुभदिनी या शक नवीन प्रचलित हो राज्यभरी!४

कवि : श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment