Wednesday, August 1, 2018

स्मृती जागवू लोकमान्यांची!

सदैव जागे रहावयाचे, रात्र वैऱ्याची
आज पुन्हा हो स्मृती जागवू लोकमान्यांची!ध्रु.

चरणांपाशी बसून जाणू अर्थ स्वराज्याचा
बलोपासना करून घालू पाया कार्याचा
संघटनेची कला देणगी गणेशरायाची!१

मायभूवरी प्रेम कराया अडचण हो कुठली
तळमळ मनि जर समजा कोडी क्षणात उलगडली
बालवयातच छात्रा आवड लागे गणिताची!२

शिवरायांचे रूप आठवू त्यांचा उद्योग
अजिंक्य ध्येयासक्ती त्यांची तसा कर्मयोग
राज्य हिंदवी व्हावे ऐसी इच्छा सगळ्यांची!३

वसन स्वदेशी भाषा अपुली सुयोग्य ज्ञानाला
वेळ न लागे असाध्य ते ते साध्य बनायाला
भारतवासी बाळगोत मनि चाड न्यायाची!४

शेतीमध्ये सुधारणा त्या नव्या यंत्रशाळा
विज्ञानाचे शोध नवनवे पूरक प्रगतीला
ढळू न देऊ व्यवहाराची बैठक नीतीची!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment