Friday, August 17, 2018

तुलसीदास

तुलसीदास

भांगेहूनही हीन जरी मी तुलसी माझे नाम
दास म्हणविले मी मज जेव्हा, स्वामी झाला राम!१

जन्म दिला जरी मायपित्यांनी केला माझा त्याग
दुःख जाणले रघुनाथांनी जीवन केले याग!२

नाम जाहले मला अनावर सदैव घोकत राम
त्या नामाने लंपटासही केलेसे निष्काम!३

रामाहुन नामाची शक्ती अधिक असे खचित
तेच घडविले कर्म हातुनी सदैव जे उचित!४

वेष धरावा मुनिचा आणखी रामाचा सहवास
तोच भागवे तनामनाची युगायुगांची प्यास!५

मनास व्हावे ज्ञान वाटले ऐका रामकथा
ऐकुन गाउन चला अनुसरू भक्तीच्या पंथा!६

जानकीनाथा विकलो गेलो ना भय ना चिंता
द्वंद्व निमाले दुःख पळाले चित्ती ये समता!७

देश कोश कुल धर्म कर्म धन धान्य गतीही राम
जो गुंतवतो तो सोडवतो नामनिवासी राम!८

रामनाम हे सार जीवनी सूरतालही राम
वक्ता लेखक श्रोता गायक तन्मयताही राम!९

हृदय विकारांनी भरलेले वर्तन हो बेफाम
नाम रसायन होउन निशिदिन जगवी मजसी राम !१०

दोन चारदा नाम आळविता मनास ये भरते
रामचरितमानस गाताना शांति वास करते!११

दीनावरती दया करतसे करुणासागर राम
दानशूर तो मीच भिकारी पतित मी पावन राम!१२

मना आवरुन थकलो पुरता धावा मी मांडला
नाचनाचुनी जीव शिणूनी मरायला टेकला!१३

मारुतिराया भजनी प्रेमा दे दे तुलसीला
जीवनी यावा राम म्हणूनी निधडा कर रे मला!१४

जो रमतो तो राम पोषितो माझा संतोष
स्तिमित होत मन  असा पाहुनी भजनी आवेश!१५

लिही रामायण गा रामायण गजानना पुन्हा
शतशतके ही सुधीर वाहो शरयूची करुणा!१६

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment