Sunday, August 19, 2018

आई, बाबा ऋणात राहू..

बाबा तर जन्माचा दाता, तशी जन्मदा आई
पुंडलिकांनो त्या दोघांना अंतर देणे नाही! ध्रु.

जन्मभरी ते कष्ट उपसती, तसे निपटती घाम
गृहिणीसंगे गृहस्थसुद्धा घेत न पळ विश्राम
संस्कारांची देत शिदोरी, अजून सरली नाही!१

धाकामागे प्रेमच दडले, चोप विसरती बाळे
गहिवरताती आठवणींनी, गाल ओलसर झाले
मौक्तिकमाला ती अश्रूंची, गंध चंदनी येई!२

कधी खेळती मांडीवरती नात नि नातू ऐसे
आई बाबा आतुर ऐसे उत्सुकता ही हासे
शिल्प येत ते आकाराला, अनुभव आला देही!३

पालक बनणे नसते सोपे, वाण सतीचे आहे
जिवंतपणिही जळत राहणे असिधाराव्रत राहे
वार्धक्यातही श्रीपरमेश्वर तत्पर देण्या ग्वाही!४

समाजजीवन घेवो अनुभव कौटुंबिक बंधांचा
तोडू जाता तुटत न नाती, राम नित्य सीतेचा
भारतीय हे भाग्यवंत जगि डंका झडतच राही!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२७/१०/२००८

No comments:

Post a Comment