Wednesday, August 15, 2018

सत्यवान सावित्री व्हावे..

नर नारींनी मनी धरावे सत्यवान सावित्री व्हावे!ध्रु.

सावित्रीचे व्रत हे खडतर, तिच्या पतीचे भाग्य महत्तर
धनाहून सद्गुणच महत्तर, मन जर कणखर शरीर कणखर
सार कथेचे जाणून घ्यावे!१

पर्णकुटीतही स्वर्ग आणला, भूषण ठरली उभय कुलाला
बुद्ध्या वरिले तिने पतीला, निष्ठा जिंके कळीकाळाला
का काळाला व्यर्थच भ्यावे?

धर्म जाणुनी करा आचरण सदैव सत्य नि मंजुळ भाषण
मन कोणाचे कधी न दुखवुन, देह न मी हे दिले दाखवुन
यमराजाला पिता करावे!३

आदि अंत ना कळे वटाचा, जन्म तनाचा ना आत्म्याचा
सोऽहं  स्मरता मुकीच वाचा, नरदेही हा मोक्षच साचा
बुद्धिबळाने स्तिमित करावे!४

तने निरोगी मने विरागी संतोषी जो मोहा त्यागी
कधि न म्हणावे मी हतभागी आनंद वितरा जागोजागी
सुखदुःखाना लंघुन जावे!५

विधुर नि विधवा नसते कोणी, सोबत लाभे अंतरातुनी
यमहि बद्ध कर्तव्यबंधनी सावित्री सत्यास अग्रणी
श्रीरामा हे कळुनि वळावे!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment