Sunday, August 26, 2018

श्रीसत्यनारायण व्रत हे, खूण भगवंताची.


प्रत्येक घराचे मंदिर व्हावे.
श्रीसत्यनारायण व्रताने हे घडू शकेल.
भजनाने प्रत्येकाच्या अंतःकरणातला भगवंत जागा होईल.
श्रमाचा, प्रामाणिकपणाचा पैसा काय तो खरा.
आपल्याजवळ असलेल्यामधून थोडेतरी दुसऱ्याला देऊन पाहावे.
द्यावे आणि विसरावे.
असे झाले की समाजच राम वाटेल.
भगवंताच्या अस्तित्वाची खूण पटल्याशिवाय कशी राहील?

श्रीसत्यनारायण व्रत हे,
खूण भगवंताची!ध्रु.

व्रते शुभंकर घर हो मंदिर
घर हो मंदिर , प्रसन्न परिसर
स्फूर्ति होत भजनाची!१

नकोच धन मज कष्ट न करता
कष्ट न करता कुठे तृप्तता?
महती परिश्रमांची!२

जे जवळी ते थोडे द्यावे
थोडे द्यावे विसरुनि जावे
गुरुकिल्ली मोक्षाची!३

समाज गमतो इथेच राम
इथेच राम जेथे नाम
आवड नैतिकतेची!४

थेंब न दिसतो गंगा वाहे
गंगा वाहे तैसा आहे
प्रचीति सातत्याची!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(सुजनहो सत्यच नारायण मधून)

No comments:

Post a Comment