Friday, August 3, 2018

विठ्ठल सापडला!



विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल म्हणता विठ्ठल सापडला
सोऽहं सूत्रे परमप्रेमे तो बंदी झाला! ध्रु.

वीट फेकली पुंडलिकाने थांब जरा म्हटले
वीट केवढी तिच्यावरी श्रीपांडुरंग ठाकले
कटीवरी कर ठेवुनि विठ्ठल सांभाळी तोला!१

कर्तव्याच्या आचरणाने श्रीहरि संतुष्ट
युगे लोटली तरी न त्याला थोडेही कष्ट
वारकऱ्यांना विठू बोलवी या या भेटीला!२

उभा राहुनी हेच सुचवितो कीर्तनात जागा
परस्परांना विठ्ठल मानुन प्रेमाने वागा
घरी पंढरी देहमंदिरी भेटत जा विठ्ठला!३

विठ्ठलात रखुमाई भरली कळला एकपणा
मी तू शब्दा वावच नाही कोठे दुजेपणा
चिंतन रमवी नाम स्फुरवी रुची अभंगाला!४

विठुरायाच्या पायी डोई यात सर्व आले
मी माझेपण पूर्ण हरपले आसू ओघळले
स्वरूप आनंदाचा अनुभव श्रीरामा आला!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment