Thursday, August 9, 2018

अरे जिवा जगावेस उत्साहाने, आनंदाने..

अरे जिवा जगावेस उत्साहाने, आनंदाने
नको गुंतू व्यसनात देह देवाचेच देणे!

नको हव्यास कसला मिळे काही न मागता
जर गाळलास घाम तुझ्या भुकेची त्या चिंता!

एका जागी बैस जरा जग धावते पळते
अरे मिटल्या डोळ्यात नील आभा प्रवेशते!

देह भिन्न एक आत्मा पशुपक्ष्यांत, जनांत
एक तृप्ती असे त्याची पहा एक अनेकांत!

फक्त देहाचा विचार तिथे सुरू अनाचार
करी वासना बेजार कैसा देव भेटणार?

गोड बोलता वागता मैत्री नकळत होते
सुखदुःखी सहभाग जगावेगळेच नाते

जन्म ज्याला त्याला मृत्यु धन येते तैसे जाते
वेडे माणूस झुरते संत संसारी ना गुंते

कर सुखाने संसार जरी असला असार
नाम हेच एक सार सकलांना तारणार

देह करू देत काम मुखे घेऊ जाता नाम
इहलोक परंधाम एकरूप वाटे ठाम

ऐसा बाळग विश्वास घेता विठ्ठलाचा ध्यास
तुटे अज्ञानाचा फास मुखी अमृताचा घास

नको रडू, झुरु नको नको काम, क्रोध नको
नको शंका, चिंता नको हातपाय गाळू नको

अरे जिवा जगावेस उत्साहाने आनंदाने
नको गुंतू व्यसनात देह देवाचेच देणे

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment