Thursday, August 9, 2018

चले जाव....

चले जाव

"छोडो भारत!" तुम्हा बजावत नका बघू वळुनी मागे
चाळिस कोटी प्रजाजनांचा सागर गर्जत हे सांगे
करेंगे या मरेंगे!

नेत्री तुमच्या असेल शक्ती बघाच तर मग हा वणवा
रणातुनी माघार घेतसा हरता नित्य प्रदेश नवा
कुवत या क्षणि तुमची कळली
आजादी अपनी लेंगे!

मातृभूमिते संरक्षाया अम्हीच सैनिक सिद्ध असू
स्वातंत्र्याते मान्य करा तुम्हि कशास आता रुसुफुसू
घराघरातुन नृसिंह गर्जत
दुश्मन को भगाएंगे!

सत्ता द्या तर सहकार्याची अम्हास कळते ही भाषा
ना तरि या क्षणि हे आंग्लांनो गुंडाळावा तुम्हि गाशा
हितार्थ अपुल्या स्वदेशास जा
तब ही इज्जत करेंगे!

सेना तुमची राहिल राहो भारतीय घ्या सेनानी
देतो तुम्हा हे आश्वासन, संकटि राखू जिनगानी
हेही म्हणणे मान्य नसे तर
कौमी जंग पुकारेंगे!

हरेक महिला जागृत झाली गाय न आता वाघिण ती
सत्ता परकी पाहुनि त्वेषे आवळताती बाळमुठी
चलेजाव इस नारेसे हम
आसमान को भर देंगे!

अपुल्या मनचे नेता बोले, जनता गहिवरली आता
उधाण आले उत्साहाला हर्षाते सीमा नुरता
मोहनचंद्रा सुखे पाहता सागरास आले भरते
तो ही गर्जत गर्जत उठला
करेंगे या मरेंगे!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment