Sunday, October 14, 2018

राजहंस तू....

कसले अवघड सोपे सगळे
राजहंस तू बाकी बगळे!ध्रु.

आपआपला धरी भरवसा
कालावर उमटवी पदठसा
परब्रह्म जगि बाळ सानुले!१

शिशुपण बरवे लेप न कसला
बालभक्त अत्यंत सोवळा
भलतेसलते मना न शिवले!२

बाप्पा आतुन जे सांगतसे
नाम तयाचे तो वदवतसे
कधी कुठेही भजन रंगले!३

प्रश्नामागुन प्रश्न जन्मती
आपोआपच सगळे सुटती
त्यांचे ओझे का शिरि धरले!४

कर्तव्याची कास धरावी
फिकीर दुखण्याची न करावी
थोरपणाचे माप वेगळे!५

नित्य नवा दिस जगण्यासाठी
आनंद देण्याघेण्यासाठी
चिखलामध्ये कमळ उमलले!६

सोपवले सगळे देवावर
भक्त उमावर भक्त रमावर
प्रसन्नतेने भाग्य हासले!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२७.०४.२००४

No comments:

Post a Comment