Saturday, April 13, 2019

त्रयोदशाक्षरी मंत्र

श्रीराम जय राम जय जय राम ।।ध्रु. ।।

धाव मनाची बाहेर, दौडत जाई चौफेर
मना उलटता होते नाम ।।१।।

'चिंता' करतो विश्वाची', कैसी वचने बाळाची
नारायण त्या सार्थची नाम ।।२।।

वेड लागता नामाचे, बंधन गळले देहाचे
सोsहम् हंस: प्रभु श्रीराम ।।३।।

नकोस गुंतू तू कामी, तुझ्या मनाचा तू स्वामी
अंतरि वसला आत्माराम ।।४।।

'दासबोध' तू जाणावा, मनोबोध ही बाणावा
त्या दोन्हीतून दिसेल राम ।।५।।

वाणी तुकया देहुचा, अभंग हो त्याची वाचा
भंडारा ही घेतो नाम ।।६।।

मंडाले वा वाड्यात, लोकमान्य ते स्थिरचित्त
गीता त्यांना दे विश्राम ।।७।।

ग्रामसफाई करताना बापट गाती हरिभजना
श्रीहरि हे मुखि त्यांच्या नाम ।।८।।

मांडीवर खेळे बाळ, रुणझुणती त्याचे चाळ
त्याच्या कानी जावो नाम ।।९।।

नाम मनाचे अन्न असे, भक्ति भाव हा पोसतसे
कर्म घडतसे ते निष्काम ।। १०।।

प्रपंच आहे रामाचा, हे जाणे तो भाग्याचा
अंतरि त्याच्या रंगे नाम ।।११।।

चिंता कसली करू नये, रामाला विस्मरू नये
येता जाता घ्यावे नाम ।।१२।।

तनामनाचे रोग बरे, रामराय हे वैद्य खरे
अनुभव ऐसा देते नाम ।।१३।।

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

No comments:

Post a Comment