Monday, April 15, 2019

विसरू कसे तुम्हाला?

हौतात्म्य प्राप्त झाले, राष्ट्रार्थ सर्व दिधले
जे रक्त सांडलेले, नाही अजून सुकले
हे राष्ट्रवीर तुम्हां अर्पित पुष्पमाला
विसरू कसे तुम्हाला? १

स्मृति आपुली अम्हाला संजीवनी ठरावी
कृती आपुली अम्हाला चैतन्यस्रोत व्हावी
हे राष्ट्रवीर तुम्ही रुधिरात चिंब न्हाला
विसरू कसे तुम्हाला? २

स्वातंत्र्य अगर मृत्यू ना अन्य ज्या विराम
ऐसा पुकारलात संग्राम अष्टयाम
हे राष्ट्रवीर आम्ही घेतोच या व्रताला
विसरू कसे तुम्हाला? ३

तुमचीच संतती ही त्यागास सिद्ध झाली
विसरून जातिपाति ती एकरूप झाली
हे राष्ट्रवीर आम्ही उच्चारितो प्रणाला
विसरू कसे तुम्हाला? ४

वरदान द्या असे की विरतील क्षुद्र स्वार्थ
वरदान द्या असे की साधेल देशस्वार्थ
हे राष्ट्रवीर प्रणती अति नम्र याचि काला
विसरू कसे तुम्हाला? ५

कर्तृत्व स्फूर्तिदायी, हौतात्म्य स्फूर्तिदायी
ते ऐक्य स्फूर्तिदायी, ते शौर्य स्फूर्तिदायी
हे राष्ट्रवीर वितरा आशीर्वचांसि सकला
विसरू कसे तुम्हाला? ६

मारो फिरंगी काटो हा घोष गगनभेदी
ते स्तंभ जे वधार्थ ठरल्यात यज्ञवेदी
हे राष्ट्रवीर चरणी उत्स्फूर्त पंक्तिमाला
विसरू कसे तुम्हाला? ७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment