Friday, April 5, 2019

बोटे तुटली, रक्त ठिबकले, नच गेला निजधामा? मामा, नच गेला निजधामा?

पुन्हा पुन्हा निरखुनि बोटांना काय पाहता मामा?
अहो काय पाहता मामा?
बोटे तुटली? रक्त ठिबकले? नच गेला निजधामा?
मामा, नच गेला निजधामा?

यमुनाडोही जसा कालिया
तसे महाली राहिलात या
आज तुम्हाला परि मर्दाया
शिवकृष्णाने उडी घेतली, आक्रमकाला नसे क्षमा!
आक्रमकाला नसे क्षमा!
बोटे तुटली, रक्त ठिबकले, नच गेला निजधामा?
मामा, नच गेला निजधामा?

आठवते का लालमहाली
शिवाशिवी तिमिरांत रंगली
रक्तसिंचने, धरणी भिजली
तधि जनान्यात दडला ना? पळता भुइ थोडी ना?
मामा, पळता भुइ थोडी ना?
बोटे तुटली, रक्त ठिबकले, नच गेला निजधामा?
मामा, नच गेला निजधामा?

ललनांना नच कधीहि वधणे
मावळजन हे मुळात जाणे
तिमिरी न कळे, कुणा मारणे
दैवगतीने मेली कोणी? दोष द्यायचा कसा कुणा?
अहो दोष द्यायचा कसा कुणा?
बोटे तुटली, रक्त ठिबकले, नच गेला निजधामा?
मामा, नच गेला निजधामा?

जसा मारुती दाढी जाळी
तसा शिवाजी तुम्हास पोळी
केवळ बोटे तुटणे भाळी
रक्त ठिबकले, तया ठिबकु द्या, जान बची पर आबरू ना!
बोटे तुटली, रक्त ठिबकले, नच गेला निजधामा?
मामा, नच गेला निजधामा?

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment