भूमातेची तुझी योग्यता, खाशी किती खस्ता
माते, तू तुजसम देवता!ध्रु.
कष्टाळूपण जगावेगळे
घरे तुजमुळे गमत राउळे
देवाची मंदिरे साजिरी, लवतो मम माथा!१
सोशिकतेला नाही सीमा
तव संतोषे हसे श्रीरमा
स्वर्ग धरेवर हसत आणशी करुनि स्तिमित जगा!२
आद्य गुरु तू जीवनातला
सेवेचा मधु पाठ शिकवला
कधि उत्तेजन, कधि वाक्ताडन आकारा देता!३
चकमक झडता ठिणगी पडते
तव शब्दांनी जागृति येते
कृतज्ञतेने गहिवरले मी हात तुला जोडता!४
रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले
(श्यामची आई वर आधारित कविता -लेखनकाल सप्टेंबर १९७३)
No comments:
Post a Comment