Wednesday, May 15, 2019

स्वराज्यसूर्या तुला अर्घ्य हे धारातीर्थांचे तुझ्याचसाठी हार, घडविले अमोल रत्नांचे

स्वराज्यसूर्या तुला अर्घ्य हे धारातीर्थांचे
तुझ्याचसाठी हार, घडविले अमोल रत्नांचे!ध्रु.

अगणित माता होत सुभद्रा
असंख्य कन्या तशा उत्तरा
शत अभिमन्यू गेले करुनी सार्थक जन्माचे
तुझ्याचसाठी हार, घडविले अमोल रत्नांचे!

दिवा दिव्याने लागे जैसा
ध्येयाग्नि उरी पेटुनि तैसा
आगमनास्तव तुझिया, केले होमहवन प्राणांचे
तुझ्याचसाठी हार, घडविले अमोल रत्नांचे!

धन्य जगति ते आत्मसमर्पण
ज्यातुनि प्रगटे हे सिंहासन
अधिष्ठान लाभले तयाला पावन आत्म्यांचे
तुझ्याचसाठी हार, घडविले अमोल रत्नांचे!

दास्याच्या तिमिराचा अंतक
सत्कार्याचा तूंची प्रेरक
जीवनदात्या लोटांगण हे पामर देहांचे
तुझ्याचसाठी हार, घडविले अमोल रत्नांचे!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment