Sunday, June 16, 2019

फादर्स डे निमित्त ग्रंथसंवाद मध्ये आलेला हा लेख..

श्रीराम बाळकृष्ण आठवले, हे माझे वडील. आम्ही त्यांना अण्णा म्हणत असू. त्यांचा जन्म ५ मे १९३३ ला झाला. आठवले कुटुंब हे मूळचे मिरजेचे. माझे आजोबा पुण्यात स्थायिक झाले. ते शिल्पकार होते. त्यांचा कलेचा वारसा अण्णांमधे उतरला तो लेखनाच्या रुपात. 

अण्णा भावेस्कुलमधे शिक्षक होते.  आजही त्यांचे विद्यार्थी त्यांची आठवण काढतात. ‘ऑफ’ तासाला ते कुठल्या वर्गावर गेले की मुलांकडून कविता म्हणून घायचे. काही विद्यार्थ्यांना अजूनही त्या कविता पाठ आहेत.  त्यांचे शिकवायचे विषय संस्कृत, मराठी आणि हिंदी हे  होते. मुळात भाषेवर प्रभुत्व होतं, उच्चार स्पष्ट होते, वक्तृत्व उत्तम होतं... त्यामुळे मुले वर्गात रमून जात असत. त्यांनी संस्कृतमधे लिखाणही केलं विशेषतः सुभाषिते लिहिली. नी. शं. नवरे तरुण भारत मधे सुभाषित लिहायचे त्यांच्यानंतर दोन वर्षे अण्णा तरुण भारतसाठी सुभाषिते  लिहायचे. 

काहीही लिखाण केले की त्याच्यावर दिनांक आणि वेळ टाकायची अण्णांना सवय होती. त्यावरून पहिली कविता त्यांनी २४ जानेवारी १९५५ला लिहिली असे कळते. आणि शेवटपर्यंत म्हणजे अगदी २०१२ पर्यंत ते साहित्यसेवा करत होते.  त्यांनी भूपाळी, अभंग, आरती, पोवाडा, फटका असे विविध काव्यप्रकार चोखाळले. पोथी लिहिली, भक्तीस्तोत्र ही रचली. प्रसंगांवर आधारितही त्यांचं बरंच लिखाण होतं. विवाह, उपनयन या विषयांवर ही त्यांचं काव्य होतं. उपनयन संस्कार गीतावली हे त्यांचं काव्य १९७१ मधे चित्रशाळा प्रेस मधून प्रकाशित झाले. एवढंच काय मरणावर ही त्यांनी काव्य केलं. त्यांनी पद्य आणि गद्य असं दोन्ही लेखन केलं. हिंदीमधेही त्यांनी काव्य केलं. मला आठवतंय ग्राहक मंचासाठी त्यांनी हिंदी कविता केल्या होत्या.

१९६२ मधे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या शिवगीता या काव्याचे कार्यक्रम गजाननराव वाटवे करत असत. वाटव्यांनी त्याला संगीत दिलं होतं. त्यातली ४ गाणी एच एम व्ही नं रेकॉर्ड केली होती. यातली दोन गाणी वाटव्यांनी तर दोन जानकी अय्यर यांनी गायली होती. अण्णांचे एक वैशिष्ट्य होतं की ते कविता स्फुरल्यावर बरेच वेळा बाजूला कुठल्या रागात म्हणायची ते ही लिहित असत. अशाप्रकारे त्यांचे गायनाविषयीचे ज्ञानही नकळतपणे डोकावत राही.

सुरवातीला विविध विषयांवर आणि विविध व्यक्तींच्या चरित्रांवर आधारित काव्य केल्यानंतर, त्यांनी मुख्यत्वे अध्यात्मिक आणि विशेषतः गीतेवर काव्य आणि लिखाण केले. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी, महात्मा फुले, सेनापती बापट, महर्षी कर्वे, रामकृष्ण परमहंस, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, रामदास स्वामी, साई बाबा, गजानन महाराज शेगाव, स्वामी स्वरूपानंद आदि विभूतींवर त्यांचे विपुल लेखन आहे. ‘काव्यमय सावरकर दर्शन’ हा त्यांच्या कवितांचा कार्यक्रम  अण्णा, त्यांचे विद्यार्थी आणि नंतर सहकारी झालेले श्री. श्री वा कुलकर्णी सर (जे निवेदन आणि कविता वाचन करायचे) आणि रंजना गोखले या गायिका असे करायचे. कुलकर्णी सर आणि अण्णा महात्मा गांधी, महात्मा फुले यांच्यावरच्या कवितांचा ही कार्यक्रम करायचे. त्या दोन्ही कार्यक्रमांना प्रतिसादही चांगला मिळायचा. राजभाषा सभेने तेव्हा एक महात्मा गांधींवरच्या कवितांचा कार्यक्रम केला होता आणि त्या कार्यक्रमाला गदिमा प्रेक्षकांमधे होते. त्यात अण्णांच्या एका कवितेमध्ये "शस्त्राघाता, शस्त्र न उत्तर" अशी ओळ आहे.  ही कविता कुलकर्णी सर वाचत होते आणि या ओळीला खूप दाद मिळाली. गदिमांच्या एका गाण्यात ‘शस्त्राघाता शस्त्रच  उत्तर’ अशी ओळ आहे. पण तरीही कार्यक्रम संपल्यावर गदिमांनी सुद्धा दाद दिली असं कुलकर्णी सर सांगतात. 

भगवद्गीता हा त्यांच्या आवडीचा विषय. पुण्यातल्या गीता धर्म मंडळात त्यांचं नेहमी जाणं असायचं. मंडळांच्या गीता दर्शन या मासिकात ते नेहमी लिहायचे. "कथा ही भगवद्गीतेची" हे त्यांनी लिहिलेलं पुस्तक गीता धर्म मंडळाने प्रकाशित केलं. संतकृपा प्रकाशनाने त्यांचं "सद्गुरू श्री नारायण महाराज, बेट केडगाव" हे चरित्र संतचरित्र मालेत प्रकाशित केलं.  

पुढे अण्णा देवधर (गिझरवाले) यांच्याशी परिचय झाला. त्यानंतर श्रीकृष्ण प्रकाशन या माध्यमातून त्यांची अनेक छोटी छोटी काव्यपुष्पे प्रसिद्ध झाली. त्याचे कार्यक्रम "ओंकार संगीत साधना" हा ग्रुप करत असे. त्यात निवेदन अण्णा करायचे. "गीता कळते गाता गाता" आणि "श्रोतेमुखी रामायण" हे त्यातील विशेष कार्यक्रम. त्याच काळात त्यांनी अण्णा देवधरांबरोबर सदाशिव पेठेतील नरसिंह मंदिरात संस्कार वर्ग चालू केला. त्यांनी तेव्हा लहान मुलांसाठी गाणी व प्रार्थना लिहिल्या. "बिनभिंतींची शाळा आमची आजी आजोबा गुरु", "हे प्रभो शिकवी नित्य मला श्रद्धा दे विमला" व "माझे बाबा विठ्ठल आई रखुमाई" या त्यातील काही. 

गीता धर्म मंडळाच्या गीता संथा वर्गांमध्ये त्यांचं "घरोघरी करोकरी गीता जाऊ दे" आणि "कृष्ण कृष्ण म्हण येता जाता" नेहमी म्हटलं जातं. पावसला काकड आरतीच्या वेळी त्यांनी लिहिलेली "प्रभात झाली स्वरूपनाथा या हो मम अंतरी" ही भूपाळी रोज म्हटली जाते. या तिन्ही रचनांमधून त्यांच्या विचारांचे दर्शन घडते. या रचना वर्षानुवर्षे टिकून राहतील आणि मार्गदर्शन करत राहतील अशी मला खात्री वाटते. 

गजाननराव वाटवे, मुकुंदराव गोखले, दादा फाटक या संगीत क्षेत्रांतल्या व्यक्तींचा त्यांना सहवास लाभला. या सर्वांचा अण्णांवर विशेष लोभ होता. आम्हीही नशीबवानच, कारण हे लोक आमच्या घरी नेहमी यायचे. शांताराम आठवले यांच्याकडेही त्यांच्याबरोबर गेल्याचं स्मरतंय. अध्यात्म क्षेत्रातल्या स्वामी माधवनाथ, स्वामी अमलानंद, स्वामी विद्यानंद, गणोरे आजोबा,  आबाजी पणशीकर यांच्याही ते संपर्कात आले. लेखक आणि साहित्यिक श्री न. म. जोशी त्यांचे मित्र आणि काही काळ सहकारी होते तर लेखिका मृणालिनी जोशी त्यांच्या गुरुभगिनी. 

अण्णांची भाषा सहज, सोपी आणि सर्वांना कळेल अशी होती. शब्दभांडार ही विपुल होते त्यांचे. शब्दांचे अवडंबर त्यांच्या लिखाणात कधीच नसायचे. याउलट अनेकदा त्यांच्या लिखाणात शब्दांच्या गमती मात्र बघायला मिळतात. उदा. एका भूपाळी मधे "सुमने सु-मने अर्पण व्हावी कृपा करा सत्वरी", एका गाण्यात "मना उलटता होते नाम श्रीराम जयराम जय राम". तसंच एका कवितेत ते म्हणतात "मोहना, मोह ना राहो कोण मी मजला कळो, देहबुद्धी त्वरे जावो  सोऽहं तो मी कळो वळो". 

त्यांना स्वत: वाचून दाखवण्याची विशेष आवड होती. विशेषकरून वयस्कर माणसांना ते वाचून दाखवत असत. ते वाचत असताना ऐकत राहावंसं वाटायचं. जीवनात त्यांना बरेच आघात सहन करावे लागले. माझ्या थोरल्या भावाचे आकस्मिक निधन हा तसं पाहिलं तर त्यांना बसलेला खूप मोठा धक्का होता. पण त्यातून ईश्वर कृपेने ते बऱ्यापैकी सावरु शकले, ते त्यांच्या या साहित्यसेवेमुळेच. त्यावेळी त्यांनी लिहिलेल्या ओळी आहेत "रडून काय कधी मना गेला जीव येत असतो, झटक मोह देहाचा तू कोणीच येथे राहात नसतो".

या सगळ्या साहित्य प्रवासात माझी आई प्रतिभा सावलीसारखी त्यांच्याबरोबर असायची. कधी लेखनिक म्हणून तर कधी श्रोता म्हणून आणि बरेचदा सहगायिका म्हणून.  तिचं नावही म्हणूनच प्रतिभा, खरंच ती त्यांची प्रतिभा होती. संसाराचा भार सगळा तिनं सांभाळल्याने अण्णांचा साहित्यप्रवास अखंड चालू राहू शकला. आजही त्यांच्या कविता, स्तोत्र आई गुणगुणत असते.

त्यांचा स्वभाव संकोची असल्यामुळे असेल कदाचित पण त्या काळात त्यांच्या साहित्याला तसा कमी वाव मिळाला असावा. अर्थात त्यावेळी खूपच दिग्गज लोक होते साहित्य क्षेत्रात. आजच्या सारखं सोशल नेटवर्किंग असतं तर हे लिखाण जास्त लोकांपर्यंत गेलं असतं. मी हा ब्लॉगही चालू केला आहे. यावर मी त्यांचं बरचसं साहित्य आणि ऑडिओ सुद्धा अपलोड केलेले आहे.  त्यामुळे त्यांचा आवाज आणि साहित्य  आता कायम स्वरूपात आंतरजालावर राहील. 

अण्णांच्या साहित्याबद्दल अजूनही बरंच लिहिण्यासारखं आहे, पण जागेच्या मर्यादेमुळे इथे थांबतो.

No comments:

Post a Comment