Saturday, December 14, 2019

स्वभाव पाहु या....

तटस्थ होउन आपण अपुला स्वभाव पाहू या!
राम नि रावण काय व्हायचे आधी ठरवू या!ध्रु.

विकारवश तो रावण झाला संयम मग सुटला
विचार करता राम जीवनी संयम शिकलेला
तोल मनाचा राखायाला भक्तीने शिकु या!१

देहामध्ये रावण दडला अंतरात नाम
नाम स्मरता सरे वासना प्रकटे श्रीराम
निर्धाराने आपण अपुला स्वभाव बदलू या!२

अहंकार जणु मद्य प्राशुनी रावण उन्मत्त
विनम्रता ती रामापाशी मोहित करी चित्त
हवे हवेसे सकला आपण सत्वर होऊ या!३

दशाननाला स्वार्थाने त्या नष्टभ्रष्ट केले
त्यागाने श्रीरामाला त्या उंच उंच नेले
सर्वात्मकता श्रीरामाची आपण मिळवू या!४

सत्तेसाठी रावण जगला जीवन ते कसले?
सेवा करुनी रामराय तर मनोमनी आले
भक्तिदीप हा करी घेउनी वाटचाल करु या!५

कामुकता त्या दशाननाची मुख झाले काळे
वैराग्याने श्रीरामाचे जीवन ते उजळे
नामासक्ती विषयि विरक्ती आपण मिळवू या!६

तमोगुणाने दूषित रावण अंत कसा त्याचा
सत्त्वाचा श्रीरामच पुतळा भाव कसा त्याचा
सत्य शिवाचे सुंदरतेचे पूजन हो करु या!७

बहिर्मुखाला भविष्य कसले त्याचा हो नाश
अंतर्मुख श्रीरामच आत्मा जाणा अविनाश
देहातुन त्या देवदिशेला पुढती जाऊ या!८

जीवनभर अन्यायच केला रावण ना राजा
न्यायासाठी राघव लढला जनतेचा राजा
विकार हटवुन विचारास त्या अवसर देऊ या!९

राम नि रावण दोघे मानव अंतर परि मोठे
कृती देव की दानव ऐसे मनुजा दाखवते
विवेकास त्या संगे घेऊन उन्नत होऊ या!१०

राम राम म्हणताना वाल्या अतरंगि वळला
करुणासागर शब्दप्रभु श्रीवाल्मिकी बनला
सुधारण्याची संधी आपण आधी साधू या!११

नारद करती सावध सकलां सावध ते तरले
बेसावध ते प्रलयामाजी भले भले बुडले
आशिवातुन या जिवास आपण शिवा भेटवू या!१२

'मेरा मेरा' विसरायाचे 'तेरा' हे गाऊ
झाले गेले विसरायाचे सावधान राहू
उत्साहाने श्रद्धेने हो रामा आळवु या!१३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१२.०१.१९९०

No comments:

Post a Comment