Friday, May 27, 2022

लेण्‍याद्रीचा गिरिजात्‍मज गणपति - गिरिजात्‍मजा हृदयी धरा


गिरिजात्‍मजा हृदयी धरा! 
गणनाथ हे दुरिता हरा!ध्रु. 

स्‍थान गिरीवर 
अतीव शुभकर 
पथि चालण्‍या कर हा धरा! १ 

गणेश लेणे 
बहुत देखणे 
मम अंतरी तुम्‍ही भरा! २ 

अपुले शैशव 
विक्रम वैभव 
गुणसागरा करुणा करा! ३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 
२०.०९.१९७७

#अष्टविनायक गीते

महडचा वरदविनायक -जयजयकार करू! तुझा नित जयजयकार करू!



वरदविनायक। वरदविनायक! 
जयजयकार करू! तुझा नित जयजयकार करू!ध्रु. 

एकांताची मना आवडी 
इथे यावया म्‍हणुनि तातडी 
प्रतिपळ स्‍मरण करू! १ 

चालव अमुची ध्‍यानधारणा 
बळ देई गा आत्‍मचिंतना 
सोऽहं भजन करू! २ 

अनुसंधानी अम्‍ही असावे 
हृदयनिवासी प्रभो वसावे 
कर अंगीकारू! ३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले
२०.०९.१९७७ 
मधुवन्‍ती

#अष्टविनायक गीते

पालीचा बल्लाळेश्वर- हे करुणाकर दर्शन शुभकर



बल्लाळेश्वर! बल्लाळेश्वर!
हे करुणाकर, दर्शन शुभकर!ध्रु. 

गाता गाता तव नामावलि 
ब्रह्मानंदी लागे टाळी 
कोण राहतो मग देहावर! १ 

भक्तिभाव रे तूच वाढवी 
ज्ञानकवळ मुखि इवले भरवी 
जिज्ञासा तू शमवी सत्‍वर! २ 

मूर्ती रुंदट नयनी भरली 
बैठक जणु की पक्‍की झाली 
कृतज्ञ वंदन तुज विघ्‍नेश्वर! ३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 
१८.०९.१९७७
दरबारी कानडा

#अष्टविनायक गीते

Thursday, May 26, 2022

सिद्धिविनायक नमोऽस्‍तुते - सिद्धटेकचा सिद्धिविनायक



सिद्धिविनायक जयोऽस्‍तुते 
सिद्धिविनायक नमोऽस्‍तुते! ध्रु. 

गजमुख दिसशी 
चित्त चोरसी 
सिद्धिदायका नमोऽस्‍तुते!१ 

विघ्‍न नुरविशी 
हौस पुरविशी 
भक्तवत्‍सला नमोऽस्‍तुते!२ 

भक्ति शिकविशी 
समर्थ करशी 
प्रणतरक्षका नमोऽस्‍तुते!३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 
१७.०९.१९७७ 
केदार

#अष्टविनायक गीते

Wednesday, May 25, 2022

मोरगावच्या मयुरेश्वरावरील कविता

कविता पहिली

मोरया, मोरया करी दया!ध्रु. 

चिदानंद तू, परब्रह्म तू 
गुणसमुद्र तू परेशही तू 
शरण शरण सदया!१  

विघ्‍नविनाशक तू असशी 
वीर विनायक तू असशी 
भवभय ने विलया!२  

मनसिंहासनि बसण्‍या ये 
प्रबोधनासी ये रे ये 
रवि आला उदया!३  

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 
१६.०९.१९७७ 
यमन कल्‍याण



कविता दुसरी

मयुरेश्‍वरा मज उद्धरा! 
गिरिजासुता करणे त्‍वरा! ध्रु. 

मातेजवळी पुत्र म्‍हणूनी 
तिची कामना पूर्ण करोनी 
तारा आम्‍हां लंबोदरा!१  

त्रिगुणातीता श्री शिवकुमरा 
आत्‍मज्ञाना वितरा वितरा 
शरणागता हाती धरा!२  

मातीची जरी मूर्ती केली 
आत्‍मशक्ती अंतरि शिरली 
वृत्तान्त हा सगळा खरा!३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले


कविता तिसरी

तुज वंदितो मोरेश्‍वरा!ध्रु. 

मयूर वाहन तुझे शोभते 
रणांगणावर वेगे नेते 
तू संहरी विघ्‍नासुरा! १ 

जे चरणी शरणागत झाले
तुझ्या कृपेने ते उद्धरले 
सद्बुद्धि दे मोरेश्‍वरा! २ 

ॐकार जो भरला उरी 
इच्‍छा त्‍वरे पुरती करी 
मन सावरी योगीश्‍वरा! ३ 

मनात प्रतिमा तुझी उमटली 
सिंदुरचर्चित मूर्ति प्रकटली 
मोरेश्‍वरा, दे आसरा! ४ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 
०६.०१.२००६


#अष्टविनायक गीते


Tuesday, May 24, 2022

मनि भरला हो! थेऊरचा चिंतामणि!


मनि भरला हो! 
मनि भरला हो!
थेऊरचा चिंतामणि!ध्रु.

कदंब तीर्थी 
भाविक रमती
जाती रंगुनि ध्यानी!१

मन हो स्थावर
या स्थानावर
ब्रह्मा या वाखाणी!२

सात्त्विकता ये
भावभक्ति ये
वसण्या ऐशा स्थानी!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२०.०९.१९७७

#अष्टविनायक गीते

Monday, May 23, 2022

‘सावरकर’ मंत्र मनाला!


‘सावरकर’ मंत्र मनाला!
ही तीक्ष्‍ण धार खड्गाला! ध्रु. 

स्‍वातंत्र्यलक्ष्‍मी हा शब्‍द 
तप करूनि हो उपलब्‍ध 
जयनाद भेदी गगनाला!१  

नमविती बंधु मृत्‍यूला 
आगळा अर्थ जगण्‍याला 
गुरुदत्त वंद्य सकलाला!२  

मित्रांचा सजला मेळा 
तो अभिनव भारत बनला 
दिपवितात अग्निज्‍वाला!३  

दुर्दम्‍य व्‍यक्तिमत्‍वे ही 
उपमा न सापडे काही 
घ्‍या चरित्र अभ्‍यासाला!४  

जर चाड असे स्‍वत्‍वाची 
चिंता या हिंदुत्‍वाची 
सरसावा पुनरपि भाला!५  

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 
१७.०७.२००९

Wednesday, May 18, 2022

रुक्मिणी

 


मी नृपकन्‍या नाम रुक्मिणी 
वरिले श्रीकृष्‍णाला! ध्रु. 

बाह्यस्‍फूर्ती ती मावळली 
अंत:करणी मूर्ती ठसली 
निशिदिनि चाले श्रीहरिचिंतन 
दुजा न ध्‍यास मनाला! १ 

कानी आली निर्मळ कीर्ती
विषयसुखाची मला न गणती 
गोविंदच मम आत्‍मा आहे 
छंद तयाचा जडला! २ 

तनामनाने हरिमय झाले 
मी नच माझी आता उरले 
नको श्रीहरि करू उपेक्षा 
स्‍वीकारी रे मजला! ३ 

केवळ पति नच तू उद्धर्ता 
तू असशी मायेच्‍या परता 
जीव वाहिला तुझिया चरणी 
भाव न ध्‍यानी आला? ४ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 
०६.१२.१९८९

Friday, May 13, 2022

रूप धरुनि शिवबाचे सूर्य मंगळास भिडे!

दो प्रहरी दरबारी नवलकथा एक घडे 
रूप धरुनि शिवबाचे सूर्य मंगळास भिडे! सूर्य मंगळास भिडे! ध्रु.

दिपले जन दरबारी 
उत्‍कंठा जोर करी 
नेत्री नच हो मैत्री 
पटली क्षणी ही खात्री 
अंगाऱ्यासम जहाल शब्‍दांची वृष्‍टी घडे  
रूप धरुनि शिवबाचे सूर्य मंगळास भिडे! सूर्य मंगळास भिडे! १

याचसाठि काय मला? 
बोलविले आग्र्याला? 
दे झणि दे शस्‍त्राला 
अति असह्य ताप मला 
रौद्र रूप ते बघता रोम रोम होत खडे 
रूप धरुनि शिवबाचे सूर्य मंगळास भिडे! सूर्य मंगळास भिडे! २

वीर पुरुष दुरी बसला 
फुरफुरली मनी ज्‍वाला 
खिलत नको ही मजला 
वरिन याच क्षणि शूळा 
वरुनि शांत, आत तप्‍त शाह मनी पाप दडे 
रूप धरुनि शिवबाचे सूर्य मंगळास भिडे! सूर्य मंगळास भिडे! ३

कडकडता ती बिजली 
भीरू मने झणि थिजली 
आपसात कुजबुजली 
कल लेंगे खिलत अली 
नाट्य खरे येथ सुरु, तूर्त जरी पटल पडे 
रूप धरुनि शिवबाचे सूर्य मंगळास भिडे! सूर्य मंगळास भिडे! ४

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले

Monday, May 2, 2022

आनंदाश्रू झरतात

 
तात्‍याकंठी माळ फुलांची, सुगंधलहरी येतात 
आनंदाश्रू झरतात ! ध्रु. 

चोरुनि फुले गुंफिली 
कुणि माळ गळा घातली 
रत्‍नहाराहुन ही मोलाची, तुला हिला ना जगतात! १ 

आनंदाचे आले भरते 
वनवासाची मुदत संपते 
तात्‍या नेता मी अनुयायी – अडे हुंदका कंठात! २ 

दर्शन घेण्‍या झुम्‍मड लोटे 
तात्‍यावरती दृष्‍टी खिळते 
गौरव बघता हा कष्‍टांचा शीण संपला निमिषात! ३ 

दान पावले दान पावले 
चित्त डोलले, चित्त डोलले 
तात्‍या गौरव गौरव अपुला आनंदाश्रू वदतात! ४ 

भक्ति जनांची बहुमोलाची 
तात्‍या विण ना कळावयाची 
दो कुड्यांतुनि एकच आत्‍मा ऐसा अनुभव दिनरात! ५  

कथा शबरिचि आता स्‍मरते 
भक्ती भोळी मना जिंकते 
सन्‍मानांतरि अमृतगोडी शब्‍द पांगुळे होतात! ६ 

श्रीकृष्‍णाच्‍या कंठि आजला
जशी शोभली तुलसी माला 
कृतार्थतेने, कृतज्ञतेने जुळले हात ! ७ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले