Monday, May 1, 2023

श्रमात श्रीराम

 
परिश्रम रामाचे धाम
सुजनहो श्रमात श्रीराम!ध्रु.

कर्म करी तो श्रीकर्मेश्वर
जो कर्मेश्वर तो ज्ञानेश्वर
मनाला नामच विश्राम!१

कर्तव्याची निवड करावी
पुढती पुढती वाट क्रमावी
असावे आपण निष्काम!२

आलस्याचे नाव कशाला?
कर्मे मिळवा विभवयशाला
सांगतो दासाचा राम!३

कर्म असे सर्वेश्वरपूजन
नाम स्फुरवी ईश्वरचिंतन
इथे ना दामाचे काम!४

देह झिजावा देवासाठी
देह झिजावा देशासाठी
हवा तो कशास आराम?५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(सुखाचा प्रपंच हाच परमार्थ मधून)

1 comment:

  1. शुभदा अनंत आठवलेMay 1, 2023 at 7:47 AM

    सुंदर आणि समर्पक काव्य.

    ReplyDelete