Monday, May 1, 2023

देवीचे गाणे गाउ दे, आईचे गाणे

स्त्री! किती निरनिराळी रूपे तिची! पण त्या शारीरिक रूपांच्या पलीकडे जाऊन गुणपूजन करून नारीत्वाचा सन्मान करू या! देवीचा जयघोष करू या!

देवीचे गाणे गाउ दे, आईचे गाणे
गाता गाता भार आपला तिजवर सोपविणे!ध्रु.

आई होउनि कुशीत घेई, गाते अंगाई
घास भरविते कथा सांगते शिकवत ती राही
वाजे म्हणुनी जगात आता खणखणीत नाणे!१

बहीण होते, भाऊ म्हणते कौतुक माझे तिला
संगे नेते खेळवते मज, जीव असा लोभला
बहीणरूपी देवी मिळता काय कुणाला उणे!२

नारायण करण्यास नराला लक्ष्मी ती झाली
गुणसुमनांची वेल तनूची देखणीच ठरली
निमित्त नात्याचे जरि केले देवीला स्मरणे!३

कन्या होते मांडीवरती अधिकारे बसते
बोल बोबडे बोलत बोलत भातुकली खेळते
नीरसतेला सुरस करतसे देवाचे देणे!४

विभिन्न नाती एकच देवी तिजला पूजावे
असू कुठेही, असू कसेही तिला आळवावे
श्रीरामाला प्रतिभेच्या या सहवासी रमणे!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१२.१०.१९९६

No comments:

Post a Comment