Saturday, May 13, 2023

आई योगेश्‍वरी यावे माझ्या देही विलसावे !

आई योगेश्‍वरी यावे 
माझ्या देही विलसावे ! ध्रु. 

शक्ति युक्ति तू, भक्ति नीति तू 
प्रीतिरीति तू, स्‍फूर्ति तीहि तू 
अद्भुत खेळा मांडावे! १

रंगावलि तू, दीपावलि तू 
रागावलि तू, नामावलि तू 
शब्‍द तू सुचवत मज जावे! २

सरो वासना धनविभवाची 
विवंचनाही नको कशाची 
कोण मी रहस्‍य उकलावे! ३

कोकणात तू, देशावर तू 
विदर्भात तू, गोव्‍यातहि तू 
शांतते शीतलते यावे! ४

तटिनी भगिनी उषा नि रजनी 
अशनी शयनी मनी नि वदनी 
तुला मज ओळखता यावे! ५

भगवद्गीता सप्‍तशती ती 
नाथभागवत तुझी कृती ती 
अध्‍ययन अवश्‍य घडवावे! ६

हवे नको ते तूच जाणशी 
कल्‍याणाचे साधुन देशी 
अंबिके दयावती यावे! ७ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment