विश्वकर्ता, विश्वपिता व विश्वगुरु अशा परमात्म्यास नमन असो. परमात्म्याने हे विश्व निर्माण केले. ते सर्व व्यापून त्याला सामावून तो राहिला आहे. तोच निर्माता, पिता, पालनकर्ता व गुरु आहे. त्याची शक्ती आणि विस्तार याला अंत नाही. त्याच्या इतकी थोर विभूती विश्वात अन्य नाही. त्याच्या व्यापक स्वरूपाला शतश: नमस्कार असोत. तो एक व सर्व आहे.
वंदना
विश्वनाथा, विश्वरुपा, हे अरूपा वंदना!
विश्व व्यापुनि शेष उरशी निर्गुणा रे वंदना!ध्रु.
तू न दिसशी, आत वसशी, तोल माझा राखशी
योग्य जे तितकेच ते तू कार्य हातुन घडवशी
कालियाच्या मत्त माथी नाचलासी नंदना!१
माय तूचि, तात तूचि सद्गुरो असशी जसा
सगुण निर्गुण जरी विलक्षण भक्तिचा देशी वसा
आवडी आराधनेची राख इतकी याचना!२
यज्ञ जेवण, यज्ञ निद्रा, यज्ञ विश्रांती असे
यज्ञ चर्चा, यज्ञ चिंतन, यज्ञ गायनही असे
बासरीचे सूर सुंदर साथ गीता गायना!३
थोर विभुती अन्य नाही भान इतके राहु दे
स्तवन करण्या शब्द अपुरे यत्न वेडा थांबु दे
राम तो तू, कृष्ण तो तू, श्रीहरे समदर्शना!४
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(बीज अंकुरले मधून)
No comments:
Post a Comment