Sunday, May 28, 2023

शब्द साल ही वरवरची हो काढुनि टाकावी रसिकवरा हो ब्रह्मरसाची गोडी चाखावी!

शब्द साल ही वरवरची हो काढुनि टाकावी
रसिकवरा हो ब्रह्मरसाची गोडी चाखावी!१

बोलांचे या लक्ष्य ब्रह्म जे ते ध्यानी घ्यावे
नुसत्या बोला मोल न काही फोलचि समजावे!२

शब्द वाचता अंतःकरणी भाव हवा बिंबला
अर्थ न जर का ध्यानी आला शीण व्यर्थ झाला!३

शब्द सुगंधित, मृदुल, मनोहर ऐसे वेचियले
ब्रह्मरूप व्हा स्वांगे रसिका ऐसे मी म्हटले!४

आत्मानंदच रत्न अमोलिक लाभतसे भाविका
सूक्ष्मसूक्ष्मतर भाव विवरिते ज्ञानाची दीपिका!५

मानस हळवे अतीव कोमल ज्या ज्या भक्ताचे
त्यासी उमगे तत्त्व यातले तो मोदे नाचे!६

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०८.०२.१९७४
तालगीत, श्री ताल

(आहाच बोलाची वालीफ फेडिजे
आणि ब्रह्माचि याची आंगा घडिजे
मग सुखेसी सुखाडिजे सुखचि माजी
ऐसे हळुवारपण जरी येईल
तरीच हे उपेगा जाईल
एरव्ही आघवी गोठी होईल
मुकिया बहिऱ्याची
या ज्ञानेश्वरीतील ओव्यांवर आधारित काव्य. 
ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या स्वामी माधवनाथांच्या प्रवचनावर आधारित)

No comments:

Post a Comment