Saturday, May 13, 2023

अर्जुना, योग असे ऐसा!

लाभाने आनंद अथवा अलाभाने दुःख न वाटणे असे चित्ताचे समत्व हेच योगाचे सार आहे. 
सुखाच्या वेळेला सुख न दुःखाच्या वेळेला दुःख हे देहधारी माणसाला होणारच. 
विवेकाने सुखदुःख नियमित करता येते पण ते उत्पन्न होतच नाही असे नव्हे. 
आत्मानंदात वावरणाऱ्या माणसाला देहाच्या सुखदुःखांची बाधा होत नाही. तो साक्षी होऊन राहतो. 
अशा योग्यांच्या ठायी मन आणि बुद्धि यांचे ऐक्य असते. मनाचा जसजसा भगवच्चरणी लय होईल तसतसा बुद्धीचाही भगवंताविषयी सहजच निश्चय होईल - मग भगवच्चरणी मन व बुद्धि यांचे ऐक्य होते.
----------

अर्जुना, योग असे ऐसा!ध्रु. 

सुख देहाला 
दुःखहि त्याला 
दोन्हीतहि सरसा !१

मनपण सरले 
चरणी रमले 
सुयोग सुंदरसा!२ 

विवेक येई 
अंतरि राही 
वर्तनि बोध ठसा!३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
३०.०४.१९७८

(अर्जुना समत्व चित्ताचे 
तेचि सार जाण योगाचे 
जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आथी
ज्ञानेश्वरीतील या ओवीवर आधारित काव्य)
ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या स्वामी माधवनाथांच्या विवरणावर आधारित

No comments:

Post a Comment