Friday, May 5, 2023

उदे गे अंबे उदे! उदे गे अंबे उदे! तुजला स्मरता प्रगतिपथावर पाउल पडते पुढे

उदे गे अंबे उदे! उदे गे अंबे उदे!
तुजला स्मरता प्रगतिपथावर पाउल पडते पुढे!ध्रु. 

आई माझी वेळोवेळी तुझी कथा सांगते 
हात जुळवुनी मस्तक माझे तव पदि टेकवते 
तिचिया हातामधली माया स्पर्शी जाणवते!१

मशाल हातामधली आई अज्ञाना घालवी 
उपासनाबळ अंगी चढते नैराश्या संपवी 
मळवट भाळीचा मम करतो जीवन रसरसते!२ 

शब्दांचा उच्चार नाचवी,  विसरच देहाचा 
अज्ञानाचा चेंदामेंदा उदयच ज्ञानाचा
पूर्णतृप्त मी, कृतार्थ जीवन असे मला वाटे!३

मागायाचे काही नाही बसेन तव पायी
माय लेकरा ते आईला सतत बघत राही 
म्हणून हासू वदनावरचे कसे पहा खेळते!४

भावार्थाची उजळदीपिका ज्ञानदेव दाव
नाथाकरि सोपव या बाळा नाव तिरा लाव 
संतांच्या दारीचा श्वानही बनून राहू दे!५
 
हात दिलेले कर्तव्याला आसू पुसण्याला 
पाय दिलेले चालायाला जना भेटण्याला 
मना उलटुनी नाम करुनि ते अंतरि वळवू दे!६

झांज झणझणे वाजे संबळ नाद भरे देही 
स्थूल तनूही होऊन हलकी डोलत ती राही 
अभ्यासाची गोडी आई रामा लागू दे!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१५.१०.१९९६

No comments:

Post a Comment