Saturday, May 20, 2023

ही अशी जीवनी गीता!

भरभरून वर्षे मेघ
नच राखुन ठेवी काही
जे उदंड जवळी झाले
ते खुल्या मनाने देई
मज शिकवी गंगामाता
ही अशी जीवनी गीता!१

माथ्यावर तळपे सूर्य
या तपस्येस ना अंत
धरणी जरि भाजुन निघते
तरि बहरे तिथे वसंत
जणु सोशिकता भूमाता
ही अशी जीवनी गीता!२

पसरले कसे हे गगन
तव मनास ते व्यापून
बघ नयन जरासे मिटुन
ती निळा दिसे आतून
नामातच जग निर्माता
ही अशी जीवनी गीता!३

जो येई तो तो जाई
नच कुणी निरंतर राही
कर्तव्य परंतू पाही
सातत्य तयातच राही
नश्वरी अशी शाश्वतता
ही अशी जीवनी गीता!४

चिंतने उलगडे चिंता
नच दुःखाची मग वार्ता
समजून सोडवी गुंता
घे सूत्र समन्वय आता
हरि आत्मसुखाचा दाता
ही अशी जीवनी गीता!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२७.०९.१९८९

No comments:

Post a Comment