कर्माची सिद्धि अथवा असिद्धी आपल्या हाती नाही. केवळ प्राप्तकर्तव्य करीत राहून लाभालाभाबद्दल उदासीन राहणे व सर्वभूतमात्रांविषयी समभाव ठेवणे याला योग असे म्हणतात. मी कर्म करतो हे खरे नव्हे. ईश्वरच कर्मे करीत आहे. हरिस्मरणपूर्वक कर्म करावे लाभालाभाची इच्छा ठेवू नये- हेच भगवंताचे व संतांचे सांगणे आहे.
-------------
विहित कर्म हे करित रहावे -
लाभ मिळो अथवा न मिळो!ध्रु.
-------------
विहित कर्म हे करित रहावे -
लाभ मिळो अथवा न मिळो!ध्रु.
सिद्धि- असिद्धी नसती हाती
हर्ष- खेद मग कशास चित्ती
माझे मी पण गळो गळो!१
कर्मचक्र हे सुरू कधीचे
भान असावे चक्रगतीचे
कर्तेपण तर दूर पळो!२
कर्म तयाला, फलहि तयाला
योगी नित निजकर्मी रमला
धर्म आपुला कळो कळो!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२९.०४.१९७८
(परि आदरिले कर्म दैवे
जरी समाप्तीते पावे
तरी विशेषे तेथ तोषावे हेही नको
की निमित्ते कोणे एके
ते सिद्धी न वचता ठाके
तरी तेथीचेनि अपरितोखे क्षोभावे ना
या ज्ञानेश्वरीतील ओव्यांवर आधारित काव्य)
ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या स्वामी माधवनाथांच्या विवरणावर आधारित
No comments:
Post a Comment