Saturday, May 13, 2023

व्यापकपण शब्दाचे जाहला विषय विस्मयाचा!

व्यापकपण शब्दाचे जाहला विषय विस्मयाचा!ध्रु.

ऐसी शब्दाची गोडी
सुधेच्या गर्वासी खंडी
विषय जो होता श्रवणाचा,
नकळता झाला जिव्हेचा!१

चारुता ऐसी शब्दांची
उघडली खाणच रूपाची
विषय जो होता श्रवणाचा,
नकळता झाला नेत्राचा!२

महिमा कैसा हो गावा
शब्द हा सामावे विश्वा
शब्द जणु चिंतामणि गवसे-
जयाते तो नर भाग्याचा!३

साधका शब्द दीप ठरला
पंथ तेजाने झळाळला
चालणे सुगम बहुत झाले
ऋणाईत झाला शब्दाचा!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
७.२.१९७४ सारंग केरवा

(तैसे शब्दाचे व्यापकपण
देखिजे असाधारण
पाहातया भावज्ञा फावती गुण
चिंतामणीचे
हे असोतु या बोलांची ताटे भली
वरी कैवल्यरसे वोगरिली
ही प्रतिपत्ति मियां केली 
निष्कामासी
वरील ज्ञानेश्वरीतील ओव्यांवर आधारित काव्य.)
ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या स्वामी माधवनाथांच्या विवरणावर आधारित

No comments:

Post a Comment