Saturday, May 13, 2023

कर्म ते होते परिपूर्ण!

कर्म घडतसे हातुनि जितुके करिता ब्रह्मार्पण 
कर्म ते होते परिपूर्ण! ध्रु.

सागरातुनी वाफ निघतसे 
त्या वाफेतुनि मेघ बनतसे 
मेघांच्या जलधारा मिळती सागरास येऊन!१ 

सिद्धि- असिध्दी चिंता कसली? 
कर्मफुले देवास वाहिली -
नर पामर आज्ञांकित प्रभुचा कर्ता नारायण! २

"मी, माझे" हे मुख्य अडथळे 
दूर सारता झरा खळाळे 
शुद्ध प्रेमळ कर्मे देवा तोषविणे आपण!३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०९.०१.१९७४

(देखे जेतुलाले कर्म निपजे 
तेतुले आदिपुरुषी अर्पिजे 
तरी परिपूर्ण सहजे जहाले जाण
या ज्ञानेश्वरीतील ओवीवर आधारित काव्य)
ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या स्वामी माधवनाथांच्या विवरणावर आधारित

No comments:

Post a Comment