वाटते जिणे मज जेव्हा लाजिरवाणे-
मज धीर देतसे सोऽहम् चे मधु गाणे!ध्रु.
मज धीर देतसे सोऽहम् चे मधु गाणे!ध्रु.
नवसृष्टि हासरी हसवित मजला राही
पवनहि कुठुनसा पुलकित करुनी जाई
तनु होत तरलशी ऐकुनि स्वर्गिय गाणे!१
कुणि हळवी फुंकर घालुनिया दुरि जाई
जखमांची जाणिव तिळहि उरली नाही
देहत्व लोपते सोऽहम् च्या मधु गाने!२
संपले दुजेपण मी- तू पण विरलेले
गुरुकृपा अशी की तिमिरहि मावळलेले
संजीवक जीवा केवळ सोऽहं गाणे!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१६.०८.१९७७
(सोऽहं वर लिहिलेल्या काव्यापैकी एक)
No comments:
Post a Comment