Saturday, June 17, 2023

बालबोध

दिवसाला आरंभ शूचिर्भूत होऊन मातृ-पितृ वंदनाने व्हावा. गुरु स्मरणाने व्हावा. नामस्मरणाने नम्रता येते, ज्ञान प्रकटते, यश चालत येते.
 
अभ्यास करायचा सद्गुण जोडण्याचा, यश- अपयश समान मानण्याचा. प्रत्येक प्रसंगातून बोध घेण्याचा. 

देह दु:खाला काय भ्यायचे! 

प्रल्हाद, ध्रुव, अभिमन्यू, बाल शिवाजी असले आदर्श पुढे ठेवायचे आणि आत्मसात करायची श्रीज्ञानेश्वरांची क्षमा, नारायणाची विश्वचिंता, एकलव्याची गुरुनिष्ठा.

श्रवण, मनन यातून जे जे संस्कार घडतील ते देतील बाल जीवनाला योग्य तो आकार. याच विश्वासातून स्फुरले हे बालबोध नावाचे स्तोत्र-

**********


स्तोत्रा नाम बालबोध। आपआपला संवाद।
येथ बोलिला विशद। जीवनमार्ग।।१

संस्काराचे कार्य थोर। सभ्य होतो सान पोर।
विवेकाचा धरी दोर। उत्कर्षेच्छु।।२

आधी वंद्य माता पिता। मग श्रीगुरुदेवता।
यश लाभे नम्र होता। आशीर्वादे।।३

देव दिसे नमस्कारे। ज्ञान लाभे नमस्कारे।
शक्ति लाभे नमस्कारे। दक्ष त्याला।।४

जे जे उत्तम ते ते घ्यावे। निंद्य ते ते घालवावे।
शिल्प सुंदर कोरावे। सद्गुणांचे।।५

स्वच्छ देही वसे देव। स्वच्छ चित्ती वसे देव।
अंतरंगी वसे देव। आत्माराम।।६

अभ्यासाने तन वश। अभ्यासाने मन वश। 
सम दोन्ही लाभालाभ। योगियाला।।७

बाल्यी ज्ञाना देव झाला। नारायण संत झाला।
पाणक्या तो शास्त्री झाला। निश्चयाने।।८

चूक होवो भिऊ नये। विघ्न येवो भिऊ नये।
देह दुःखा भिऊ नये। काही केल्या।।९

नऊ रत्नांची ही माळ। बालका तू कंठी घाल।
सन्मार्गे तू पुढे चाल। धन्य होशी।।१०

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(सुखाचा प्रपंच हाच परमार्थ मधून)

No comments:

Post a Comment