तात नंदा अंतरीचा
भाव नच ये सांगता
लाभुनी मज दोन माता
व्यापते उरी आर्तता
दाखवू कोणा व्यथा!
जन्म घेता पारखा
एकीस झालो ज्याक्षणी
लाभता पहिली मला
दुसरीस मुकलो तत्क्षणी
माउली माझी यशोदा
स्फुंदते विजनी अता!
गोकुळाला सोडता
मज बाल्य गेले सोडुनी
नाहि उरले धुंद होणे
गायनी वा नर्तनी
न्या मला संगे व्रजाला
का मुखाला झाकता?
शैशवी माझ्या वयाच्या
प्रौढ मी झालो पुरा
कोवळ्या स्कंधावरी या
बाहणे आता धुरा
मी न अवतारी मला का
हेमबंधे बांधता!
वंदना कळवाल ना तात
व्रजवासी जना
जाणुनी मी प्रेम त्यांचे
मानसी करी अर्चना
स्वप्नवेड्या माधवाची
आसवे भिजली कथा!
छत्र जरि दोन्ही कुळांचे
झळकते माझ्या शिरी
पोरका मी मज न कोणी
शल्य सलते अंतरी
मानसीच्या भाववेली
गुंतती मी उकलता!
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(श्रीकृष्ण जीवनावर आधारित काव्यामधील एक कविता)
No comments:
Post a Comment