देहाचे धर्मसाधन म्हणून महत्त्व पटावे पण देहासक्ती नकोच नको.
कर्तृत्वाचा अहंकार नको, फलापेक्षा नसावी. जसा यत्न तसे यश!
रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग.
आपल्या मनातीलच काम क्रोधादि विकारांपासून सावध असावे.
एकटी व्यक्ती दुबळी आहे. मात्र संघशक्ती कल्पनातीत कार्य करून जाते, या जाणिवेतून युवाशक्तीला प्रबुद्ध करण्यासाठी हे युवाबोध स्तोत्र लिहिले गेले. पाहा आपल्याला यातील विचार कितपत उद्बोधक वाटतात ते -
*************
स्तोत्रा नाम युवाबोध। आपआपला उद्बोध।
हे भगवन् तू संबोध। आत्म्यालागी।।१
देह येई, देह जाई। आत्मा येत जात नाही।
स्वरूपाचा शोध घेई। भाग्यवंता।।२
कर्तृत्वाचा अहंकार। व्यर्थ शिरी कार्यभार।
अपयशाचे खुले दार। अहंमन्या।।३
संग जैसा लाभ तैसा। ध्यास जैसा लाभ तैसा।
यत्न जैसा लाभ तैसा। हे तो स्पष्ट।।४
कामक्रोध महावैरी। टपलेले तुझ्यावरी।
हो सावध त्वरा करी। पारिपत्या।।५
नि:संगाचा सखा कृष्ण। सद्भक्ताचा सखा कृष्ण।
उद्योग्याचा सखा कृष्ण। पूर्ण सत्य।।६
एक व्यक्ती करे काय? समष्टी ना करी काय?
भव्य दिव्य संघकार्य। भगद्रूप।।७
तुझा देह भारताचा। तुझा कोष भारताचा।
करी होम सर्वस्वाचा। गीताबोध।।८
उभा देश पायी चाल। तुझा दिव्य भावी काल।
संघ हाच जीवनवेद। कलौयुगे।।९
जाऊ नेदी एक क्षण। एक एक घाल घण।
निघो सोने उजळुन। जीवनाचे।।१०
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(सुखाचा प्रपंच हाच परमार्थ मधून)
No comments:
Post a Comment