Monday, June 5, 2023

जय जय स्वामी स्वरूपानंद!

जय जय स्वामी स्वरूपानंद!ध्रु.

थोर विरागी तत्त्वज्ञानी
पूर्ण ज्ञानी नच अभिमानी
सकल सुखाचा कंद!१

पावसि असुनी हृदयनिवासी
अनादि तैसा हा अविनाशी
झरत मोदनिस्यंद!२

एकच खोली ती गाभारा
अनंत तेथे ये आकारा 
सोऽहं गंध अमंद!३

ज्ञानाई या हृदयी आली
भक्ता पाहुनि हसली गाली
नामाचा धरि छंद!४

अभ्यासाचा ध्यास घेतला
कैवल्याचा पुतळा गमला
मूर्तिमंत आनंद!५

राम कृष्ण हरि जपत वैखरी
सोऽहं मुरली घुमत अंतरी
लुटणे भक्तिमरंद!६

हा सत्कविवर सद्गुरु झाला
भगवत्पदि केव्हाच पोचला
राम गात बेबंद!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment