अजून गायचे मला अजून गीत गायचे
संगती सुरांचिया पुढे पुढेच जायचे!ध्रु.
संगती सुरांचिया पुढे पुढेच जायचे!ध्रु.
श्वास श्वास दावितो वाट स्वच्छ मोकळी
काव्य रम्य थबकवी वृत्ती त्यात रंगली
गजानना जणू म्हणे तुझ्या गळ्यात राह्यचे!१
मीहि हासतो जरा वाचतो विसावतो
शब्द शब्द ऐकतो भाव पूर्ण जाणतो
दाद देत घेत मी गायनी जगायचे!२
नवा नवा क्षणोक्षणी असा नवाच वाटतो
वयहि वाढते तरी जगा युवाच वाटतो
चाल लावण्या मला नवीन पद्य गायचे!३
जुना न मी, कधी सुना, सुरांसवे विसावतो
ताल ताल देतसे समाधिसौख्य पावतो
काव्यदेवतेपदी फूल मी वाहायचे!४
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
८.६.२००१(गजाननराव वाटवे यांच्या वाढदिवसा दिवशीच्या भावना)
No comments:
Post a Comment