Tuesday, July 11, 2023

अमित हे- सद्गुरूचे उपकार

सद्गुरूचे उपकार! अमित हे- 
सद्गुरूचे उपकार!ध्रु.

अंतःकरणी होते वसले
गुरुकृपेने दिसे उदेले
परमार्थाचे ज्ञान लाभता
खुलते मुक्तिद्वार!१

अंतर्मुख वृत्तीस करविती
मौक्तिकचारा खाऊ घालती
विषयांची आवडीच नुरता
मन हो आत्माकार!२

बहिरंगाचे प्रेम मावळे
मूळ तत्त्व दृष्टीला पडले
अनुसंधाना तेच राखती
देउनि सोऽहं सार!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०४.०३.१९७४

(मोटके गुरुमुखे उदैजत दिसे
आणि हृदयी स्वयंभचि असे
प्रत्यक्ष फावो लागे तैसे
आपैसियाची
या ज्ञानेश्वरीतील ओवी वर आधारित काव्य. स्वामी माधव नाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन ७१ वर आधारित काव्य)

No comments:

Post a Comment